गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यामुळे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातून गेलं आहे. याविरोधात लागलीच उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेसह शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी थेट खडाजंगी राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं एक ट्वीट चर्चेत आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊतांनी ट्वीट केले ‘थोरांचे विचार’

संजय राऊतांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ‘थोरांचे विचार’ असं लिहिलेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये थोर राजकीय विचारवंत जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं एक विधान नमूद करण्यात आलं आहे. यामध्ये सत्ता आणि सत्ताधारी व्यक्ती यांविषयी बर्नार्ड शॉ यांनी भाष्य केलं आहे.

“सत्ता व्यक्तीला भ्रष्ट करत नाही. पण मूर्ख व्यक्ती सत्तेत आली, की ती व्यक्ती सत्तेला भ्रष्ट करायला सुरुवात करते”, असं विधान या फोटोमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या फोटोसह संजय राऊतांनी कोणतीही टीका किंवा त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नसली, तरी राज्यात सध्या निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आणि निवडणूक आयोगाचा निकाल या पार्श्वभूमीवर संजय राऊतांच्या या ट्वीटचे अनेक अर्थ लावले जात आहेत. त्यांचं हे ट्वीट म्हणजे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याचाही तर्क लावला जात आहे.

आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

दरम्यान, शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार आहे. त्यापाठोपाठ ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या निकालावर स्थगिती आणण्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. ती याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली, तर त्यावरही मुख्य याचिकेबरोबरच सुनावणी घेतली जाण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut uddhav thackeray group political tweet ahead of supreme court hearing pmw
First published on: 21-02-2023 at 09:53 IST