शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करण्यासंबंधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं वृत्त असून याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी सोनिया गांधी यांची दिल्लीत भेटल्याची चर्चा सुरु आहे. संजय राऊत यांनी मात्र काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं वृत्त फेटाळलं आहे. युपीएमध्ये शरद पवारांच्या नावाला कोणाचा विरोध असल्याची माहिती नाही असंही ते म्हणाले आहेत. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“काँग्रेसमध्ये नाराजी वैगेरे काही नाही. किंबहुना काँग्रेस पक्षातूनच अशा सूचना येत आहेत. युपीए अधिक मजबूत होण्यासाठी ही काँग्रेस पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची भूमिका आहे. सोनिया गांधीचीही तशी भूमिका असू शकते. सोनिया गांधींनी प्रदीर्घ काळ युपीएचं नेतृत्व खंबीरपणे केलं आहे, पण सध्या त्यांची प्रकृती चांगली नसते. देशात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत अशावेळी युपीएचं नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावं ही अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे. आज युपीए अत्यंत विकलांग अवस्थेत आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“UPA चं नेतृत्व आता शरद पवारांनी करावं”, संजय राऊतांनी घेतली पत्रकार परिषदेत भूमिका!

“देशात भाजपाप्रणीत एनडीएसमोर काँग्रेसप्रणीत युपीए प्रमुख विरोधकाची भूमिका निभावत आहेत. मात्र, आता युपीएची ताकद कमी झाली असून युपीएचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावं,” अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली होती.

फडणवीसांवर टीका
परमबीर सिंह यांनी खरंच ते पत्र लिहिलं आहे का असा प्रश्न निर्माण होतो की त्यांना कोणीतरी लिहून दिलं आणि त्यांनी सही केली असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत अनिल देशमुख पहिल्या दिवसापासून चौकशी करा असं सांगत आहेत असं म्हटलं. “चौकशीला कोणाचाही नकार नव्हता. मुख्यमंत्री, अनिल देशमुख, आम्ही चौकशी करा म्हणत होतो, फक्त विरोधी पक्षनेते म्हणतात चौकशी नको आधी फाशी द्या,” अशी टीका त्यांनी केली.

“चौकशीआधी फाशी त्यांच्या राजवटीत किती लोकांना दिली हा तपशील त्यांनी जाहीर केला पाहिजे. विरोधी पक्षनेते मोदींपेक्षा मोठे नेते असावेत, त्यामुळे त्यांना हे सांगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या मोठेपणाची उंची सह्याद्रीपेक्षा मोठी आहे, त्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही नीट सांभाळू शकले नाहीत. विरोधी पक्षनेत्याने त्या पदाची प्रतिष्ठा नष्ट होईल, कमी होईल असं वर्तन करु नये. शेवटी देशातील शोषित, पीडितांचा आवाज विरोधी पक्षनेता असतो, सरकार नसतं याचं भान प्रत्येत विरोधी पक्षनेत्याने ठेवलं पाहिजे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

विरोधकांचं हसू होतंय
“वारंवार राजीनाम्याची आणि सरकार बरखास्त करण्याची मागणी यामुळे विरोधी पक्षाचं हसू होतं, लोक त्यांना मूर्खात काढतात हे समजलं पाहिजे. आमच्यासाठी हा विषय संपला असून यावर आता जास्त चर्चा होता कामा नये. यामध्ये विशेष घडामोडी घडतील असं वाटत नाही,” असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं.

राज्यपालांवर टीका
“राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी पाठवून सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला. त्याबद्दल काय झालं याचा खुलासा होणं गरजेचं आहे. अभ्यास करत आहेत वैगेरे ठीक आहे, त्यातून त्यांना काही पीएचडी करायची आहे का? जी नावं पाठवली आहेत ती जास्तीत जास्त काळ आपल्या मांडीखाली कशी दाबून ठेवता येतील यासंदर्भात एखादा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड करायचा आहे का असा प्रश्न आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut upa ncp sharad pawar congress sonia gandhi sgy
First published on: 25-03-2021 at 11:07 IST