कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराने बाजी मारल्यानंतर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चांगलच ट्रोल केलं जात आहे. कोल्हापूरमधील पोटनिवडणुकीमध्ये पराभूत झाल्यास हिमालयामध्ये निघून जाण्याचं चंद्रकांत पाटलंचं वक्तव्य या निकालानंतर चर्चेत असतानाच आता शिवसेनेनं मात्र चंद्रकांत पाटलांना हिमालयामध्ये न जण्याची गळ घातलीय. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखामधून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामधील पोटनिवडणुकीवरुन चंद्रकांत पाटलांबरोबरच देशभरामधील पोटनिवडणुकींच्या निकालाचा आढावा घेत भाजपावर निशाणा साधलाय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: ‘चंपासाठी हिमालय निधी’च्या नावाखाली पुणेकरांनी गोळा केली वर्गणी; अनेकांनी दिल्या दहा दहाच्या नोटा

पोटनिवडणुका भाजपा विरोधकांनी जिंकल्या
“चार राज्यांतील पोटनिवडणुकांत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला आहे. याचा अर्थ भाजपा विरोधकांना अभूतपूर्व यश मिळाले असा होत नाही. या पोटनिवडणुकांच्या निकालाचे महत्त्व इतकेच की, भाजपा व त्यांचे भाडोत्री बगलबच्चे देशभरात धार्मिक द्वेषाचा विषाणू पसरवत असताना, निवडणुका लढविण्यासाठी व जिंकण्यासाठी जातीय, धार्मिक हिंसेचे वणवे पेटवीत असताना चार राज्यांतील पोटनिवडणुकांत भाजपाचा पराभव झाला आहे. पोटनिवडणुकांचे मतदान सुरू असतानाच हनुमान चालिसा, मशिदींवरील भोंगे विरुद्ध हनुमान चालिसा, रामनवमीच्या यात्रा असे विषय तयार करून दंगलीच्या ठिणग्या टाकल्या गेल्या. त्या पार्श्वभूमीवर प. बंगाल, छत्तीसगढ, बिहार आणि महाराष्ट्रातील पोटनिवडणुका भाजपा विरोधकांनी जिंकल्या आहेत,” असं शिवसेनेनं लेखाच्या सुरुवातीला म्हटलंय.

या सगळ्यांचा परिणाम कोल्हापूरच्या मतदारांवर झाला नाही
“कोल्हापूर उत्तरेत विजयासाठी भाजपाने प्रयत्न केले नाहीत. त्यांनी मोठी यंत्रणा कामास लावली, मोठ्या प्रमाणात पैसाअडका खर्च केला. मतदारांना पैशांचे वाटप करताना भाजपाचे लोक रंगेहाथ पकडले गेले. कोल्हापुरातील हिंदुत्ववादी मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात तळ ठोकून बसले. याचदरम्यान ‘मशिदींवरील भोंगे विरुद्ध हनुमान चालिसा’सारखे विषय तापविण्यात आले. या सगळ्यांचा परिणाम कोल्हापूरच्या मतदारांवर झाला नाही व तेथे काँग्रेसच्या जयश्री जाधव या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून जिंकून आल्या,” असा उल्लेख लेखात आहे.

जातीय हिंसा घडवू पाहणाऱ्यांना ही चपराक
“कोल्हापूरची ही जागा परंपरेने शिवसेनेची. म्हणजे हिंदुत्ववादी विचारांची पाठराखण करणारा हा मतदारसंघ. एखाददुसरा अपवाद वगळता येथे शिवसेनेचेच शिलेदार विजयी झाले. २०१९ साली अटीतटीच्या लढतीत ही जागा शिवसेनेकडून काँग्रेसकडे गेली. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने ही जागा पुन्हा शिवसेनेला मिळावी अशी मागणी होती. तरीही जयश्री जाधवांच्या प्रचार कामात शिवसैनिकांनी झोकून दिले. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत तीन पक्षांनी एकत्रितपणे काम केले व भाजपाचा डाव उधळून लावला. निवडणूक जिंकण्यासाठी जातीय हिंसा घडवू पाहणाऱ्यांना ही चपराक आहे,” असा टोला शिवसेनेनं लगावलाय.

भाजपाचा राजकीय पराभव हाच त्या विंचवावर उतारा
“पश्चिम बंगालात भाजपाने जिंकलेल्या आसनसोल मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. तेथे आता तृणमूल काँग्रेसकडून शत्रुघ्न सिन्हा विजयी झाले व त्यांनी भाजपा उमेदवाराचा साधारण तीन लाखांच्या मताधिक्याने पराभव केला. छत्तीसगढमध्ये काँग्रेस तर बिहारमधील विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रीय जनता दलाने जिंकली आहे. अशा लहान निवडणुकांत ईव्हीएमकांड व झोल करण्यात भाजपाला रस नसतो. त्याचाही लाभ विरोधकांना मिळतो. तरीही निवडणुका जिद्दीने, एकजुटीने लढवल्या की, भाजपाचा पराभव करता येतो हे सूत्र चार राज्यांतील पोटनिवडणुकांत दिसले. जातीय हिंसेवर चिंता व्यक्त करणारे संयुक्त निवेदन १३ पक्षांनी काढले. भाजपाचा राजकीय पराभव हाच त्या विंचवावर उतारा आहे. कोल्हापूर व प. बंगालने ते दाखवून दिले,” असंही शिवसेनेनं म्हटलंय.

स्वतः चंद्रकांत पाटील उतरतील व कुस्ती खेळतील असा कयास होता
“कोल्हापूर उत्तर विधानसभा काँगेसच्या जयश्री जाधव यांनी जिंकली आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली. तेथे त्यांच्या पत्नीच महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. ९७ हजार ३३२ मते मिळवून त्या विजयी झाल्या. या मतदारसंघात भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांना मिळालेली ७८ हजार २५ मते दुर्लक्षित करण्यासारखी नाहीत. भारतीय जनता पक्षाने ही जागा प्रतिष्ठेची केली होती. त्यांचे प्रांताध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या होम ग्राऊंडवर ही पोटनिवडणूक होती. या पोटनिवडणुकीत स्वतः चंद्रकांत पाटील उतरतील व कुस्ती खेळतील असा कयास होता. ‘‘कोल्हापुरात एखादी पोटनिवडणूक झाली तर मी ती लढवीन व जिंकून येईन’’ असे आव्हान पाटलांनी दिले होते, पण प्रत्यक्ष पोटनिवडणूक लागताच ते गायब झाले,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रातच राहावे. कारण…
“चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘या निवडणुकीत पराभव झाला तर राजकारण सोडून आपण हिमालयात जाऊ अशीही घोषणा केली होती. त्यांना ही संधी कोल्हापूर उत्तरच्या निवडणूक निकालाने दिली होती. ती त्यांनी साधायला हवी होती, पण आता पाटील यांनी त्यावरून पलटी मारली आहे आणि सारवासारव केली आहे. अर्थात चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रातच राहावे. कारण ते येथे राहतील तोपर्यंत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विजयी होत राहील,” असा उपहासात्मक आग्रह शिवसेनेनं केलाय.

पाटील उभे राहिले असते तर
“चंद्रकांत पाटील यांचे आता म्हणणे असे की, ‘‘सत्यजित कदम उभे राहिले तर महाविकास आघाडीला हा असा घाम फुटला. प्रत्यक्ष मी उभा राहिलो असतो तर काय झाले असते त्याचा विचार करा.’’ पाटील यांचे बोलणे गांभीर्याने घ्यावे असे नाही. ते काही लोकनेते नाहीत व कोल्हापूरच्या राजकीय परंपरेचा वारसा काय आहे याविषयी त्यांना ज्ञान नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करण्यासाठी ते बराच काळ महाराष्ट्राबाहेर होते. त्यांनी गुजरात राज्यात काम केल्याने त्यांची सध्याच्या भाजपा धुरिणांशी जवळीक झाली व त्याच नात्याने त्यांच्या हाती महसूलमंत्री पदाचे कलिंगड लागले हेच सत्य आहे. मागच्या निवडणुकीत पाटील कोल्हापुरातून कोथरूडला गेले व निवडून आले. तेथेही निवडून येताना त्यांना काय घाम फुटला होता ते महाराष्ट्राने पाहिले. म्हणजे पाटील आता त्या अर्थाने कोल्हापूरचे राहिलेले नाहीत. त्यामुळे ते निवडणुकीस उभे राहिले असते तर वेगळे चित्र दिसले असते या बेडक्या फुगविण्यात अर्थ नाही. पाटील उभे राहिले असते तर काय सांगावे, जयश्री जाधवांच्या मतांचा आकडा लाखावरही गेला असता,” असा टोला शिवसेनेकडून चंद्रकांत पाटलांना लगावण्यात आलाय.