शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे यांच्यात मागील काही दिवसांपासून ‘व्हिडीओ वॉर’ सुरू आहे. दोन्ही नेते एकमेकांचे जुने व्हिडीओ शेअर करत एकमेकांवर टीका करत आहेत. अलीकडेच नितेश राणे यांनी सुषमा अंधारेंचा एक जुना व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये सुषमा अंधारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर टीका करताना दिसत आहेत. यानंतर सुषमा अंधारे आणि नितेश राणे यांच्यात ‘व्हिडीओ वॉर’ सुरू झाला आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणावर सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सुषमा अंधारेंनी नितेश राणेंवर उपरोधिक टोलेबाजी केली आहे. नितेश राणे हा माझा भाचा असून त्याचा अभ्यास कच्चा आहे, ही घरातील गोष्टी आहे, अशी टोलेबाजी अंधारेंनी केली.
हेही वाचा- “नारायण राणेंची दोन बारकी-बारकी पोरं…” भलताच उल्लेख करत सुषमा अंधारेंची टोलेबाजी!
नितेश राणेंना उद्देशून सुषमा अंधारे म्हणाल्या, “आमच्यात ‘व्हिडीओ वॉर’ वगैरे काहीही सुरू नाही. आमच्या नितूचा अभ्यास कच्चा आहे. तो माझा भाचा आहे. त्यामुळे ही घरातली गोष्ट आहे. तो माझा वीस वर्षांपूर्वीचा म्हणजेच माझ्या महाविद्यालयीन काळातील एका वाद-विवाद स्पर्धेतला व्हिडीओ राजकारणासाठी वापरत आहे. त्यामुळे मलाही त्यांचे काही व्हिडीओ दाखवले पाहिजेत.”
हेही वाचा- संजय राऊतांना कोर्टात बोलवून अटक होणार? कटकारस्थानाबाबत मोठा गौप्यस्फोट
“त्या व्हिडीओत मी किमान विचारधारेशी संबंधित बोलत आहे. पण तुम्ही किती पातळी घसरून खाली गेला आहात, ती पातळी दाखवून देणं गरजेचं आहे. आम्ही खूप सभ्यतेनं आणि सज्जनपणाने वागण्याचा प्रयत्न करतो. दगड मारून घाण अंगावर उडवून घेण्याचं आम्ही टाळतो. पण याचा अर्थ आम्ही दुबळे आहोत, घाबरट आहोत, आम्ही भित्रे आहोत, असा अजिबात नाही” अशी टीका अंधारेंनी केली आहे.