scorecardresearch

“जर मंत्रालयाकडचं झाड नुसतं हलवलं तरी…”, संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “माझं आव्हान आहे की..”

संजय राऊत म्हणतात, “..तर तुमचं काय होणार? तुम्हाला कोण वाचवणार? तुम्ही जो पायंडा पाडलाय, तो अत्यंत घातक आहे. या देशात असं कधी घडत नव्हतं.”

sanjay raut eknath shinde
संजय राऊतांचा भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल! (संग्रहीत छायाचित्र)

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगण्याची चिन्हं दिसंत आहेत. तर दुसरीकडे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेमुळे राष्ट्रीय पातळीवरचं राजकारण तापू लागलं आहे. भाजपावर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना भाजपावर परखड शब्दांत टीका केली आहे. तसेच, मोदी सरकारला आव्हानही दिलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

“सध्या विरोधकांच्या बाबतीत पडद्यामागे काय कारस्थानं चालू आहेत, त्यांचा सुगावा लागत असतो. मला जेव्हा अटक करण्याची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हाही मी सांगत होतो की मला अटक होतेय. देशातलं वातावरण दिवसेंदिवस आणीबाणीपेक्षा भयंकर होताना दिसत आहे. राजकीय विरोधकांना विविध प्रकरणांमध्ये गुंतवून, सरकारला प्रश्न विचारणाऱ्याना गुंतवायचं, अटक करायची, जामीन मिळू द्यायचा नाही, केंद्रीय यंत्रणांचा त्यासाठी वापर करायचा हे बेफामपणे चालू आहे. दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड अशा राज्यात प्रामुख्याने चालू आहे. निवडणुका जवळ येतील तसतसं हे पुन्हा वाढत जाईल”, असं संजय राऊत म्हणाले.

“भाजपा-मिंधे गटातल्या बाटग्या हिंदूंचे रक्त…”, ‘त्या’ प्रकाराचा उल्लेख करून ठाकरे गटाचा हल्लाबोल!

“मनीष सिसोदिया दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत. शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी जगाला हेवा वाटावा असं काम केलंय. अशा प्रकारचे निर्णय हे मंत्रीमंडळाचे असतात, व्यक्तीचे नसतात. आत्तापर्यंत मंत्र्यांना अटक झाल्याचे निर्णय मंत्रीमंडळाचे होते. या देशाचं दुर्दैवं आहे की आपली लोकशाही रोज खड्ड्यात जाताना दिसत आहे. परवा केजरीवाल उद्धव ठाकरेंना भेटून गेले तेव्हाही हीच चर्चा झाली की मागे न हटता सामोरं जाऊन लढत राहायला हवं”, असंही राऊत म्हणाले.

“..त्यांना नोटीस पाठवायची तरी हिंमत दाखवली का?”

“केंद्र सरकारला माझं एक आव्हान आहे. केजरीवाल, अनिल देशमुख, सत्येंद्र जैन, संजय राऊत, नवाब मलिक, चंद्रशेखर राव यांच्या कन्या यांच्यावर कारवाया झाल्या. तुमच्या पक्षात सगळे संत आणि महात्मेच भरलेले आहेत का? महाराष्ट्रात जर मंत्रालयाकडचं झाड हलवलं तर भ्रष्टाचाराची शंभर प्रकरणं टपाटपा खाली पडतील. एलआयसीचे पैसे बुडवण्यात आले. प्रचंड नुकसान जालंय. पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक कुणी बुडवली? त्यांना साधी नोटीस पाठवण्याची तरी हिंमत दाखवली का? आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावानं सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला. पण चौकशी सुरू होताच सरकार बदललं तशी क्लीनचिट मिळाली”, अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपावर हल्लाबोल केला.

शिंदे गटानं शिवसेनेच्या सर्व ५५ आमदारांना बजावला व्हीप; ठाकरे गट काय भूमिका घेणार?

“हे सगळं लोकशाहीला अत्यंत घातक आहे. २०२४ला सत्तेवर ज्या कुणाचं सरकार येईल ते याच पद्धतीने विरोधकांच्या बाबतीत तुमच्या पावलावर पाऊल टाकून चालायला लागले, तर तुमचं काय होणार? तुम्हाला कोण वाचवणार? तुम्ही जो पायंडा पाडलाय, तो अत्यंत घातक आहे. या देशात असं कधी घडत नव्हतं. पण गेल्या ७ वर्षांत भ्रष्टाचाऱ्यांना निर्मला वॉशिंग मशीनमध्ये टाकायचं आणि स्वच्छ करून बाजूला ठेवाययचं असं चाललंय. महाराष्ट्राच्या ४० फुटलेल्या आमदारांवर कोणत्या प्रकारचे आरोप आहेत ते पाहा. आशिष शेलारांनी नगरविकास खात्याबाबत केलेली याचिका काळजीपूर्वक पाहा. सीबीआय, ईडीला हे दिसत नाही. फक्त विरोधकांची प्रकरणं दिसतात. हे गंभीर आहे”, असं सजय राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 10:30 IST
ताज्या बातम्या