एकनाथ शिंदेंनी ३९ शिवसेना आमदारांसोबत बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठं भगदाड पडलं. एकनाथ शिंदे गटानं भाजपासोबत हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचं राजकीय भवितव्य काय? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. तसेच, धनुष्यबाण हे चिन्ह देखील दोन तृतियांश लोकप्रतिनिधींचं बहुमत असणाऱ्या एकनाथ शिंदे गटाकडेच जाणार का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बंडखोर आमदारांवर तोंडसुख घेतलं. यावेळी बाळासाहेब ठाकरेंची एक आठवण सांगत उद्धव ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शिवसेनेत एवढी मोठी बंडाळी होऊन देखील उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांसोबत, पदाधिकाऱ्यांसोबत भेटीगाठी घेताना हसतमुखाने विनोद करत बोलत असल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंनी “मलाही भावना आहेत, मलाही वाईट वाटलं आहे”, असं म्हणत उत्तर दिलं आहे.

शिवसेनाप्रमुखांचं ‘ते’ वाक्य…!

यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची एक आठवण उद्धव ठाकरेंनी सांगितली. “गेले ८-१० दिवस मातोश्रीवर मोठ्या संख्येनं लोक येत आहे. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. शिवसेनाप्रमुखांचं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवण्यासारखं असतं. त्यांना कुणीतरी विचारलं होतं की तुम्हाला वाईट वाटतं की नाही? ते म्हणाले होते की माशाच्या डोळ्यातले अश्रू कुणाला दिसत नाहीत”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Uddhav Thackeray PC : “आम्हीच खरी शिवसेना” म्हणणाऱ्या बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले, “शिवसेना ही काही…”!

“मलाही वाईट वाटलंय, पण…”

दरम्यान वातावरण हलकं करण्यासाठी किंचित विनोद करतो असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “भावना मलाही आहेत, वाईट मलाही वाटलं आहे. त्याबद्दल मी बोललो आहे, उद्याही बोलेन. पण हे बोलताना माझ्या शिवसैनिकांवर दडपण वाढेल असं मी बोललो तर मी बरोबर करणार नाही. जे दडपण येण्याची शक्यताच नाही, ते दडपण नाहीये हे सांगण्याचं माझं काम आहे. कुणीतरी मला म्हणालं की या वातावरणात देखील तुम्हाला गंमत कशी सुचते. ती गंमत नसते, पण वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न असतो”, असं ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी बोलताना देखील उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच एक किस्सा सांगून वातावरण काहीसं हलकं केलं. “काही दिवसांपूर्वीपर्यंत मी पॉझिटिव्ह होतो. २ दिवसांपूर्वी डॉक्टर येऊन तपासून गेले. पोस्ट कोविडचा काही त्रास झाला का? असा प्रश्न त्यांनी विचारला. मी म्हटलं पोस्ट कोविडचा त्रास मला जेवढा झाला असेल, तेवढा कुणाला झाला नसेल. कारण कोविड झाल्यानंतरच या सगळ्या घडामोडी झाल्या. हे एक वेगळं लक्षण तुमच्या अभ्यासात लिहून ठेवायचं असेल तर ठेवा, की ज्याला कोविड होतो त्यालाच त्रास होतो अशातला भाग नाही. पण इतरांच्याही डोक्यात काय विक्षिप्तपणा येतो माहीत नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.