एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकाणात खळबळ उडाली आहे. जलील यांच्या या प्रस्तावामुळे राज्यात नवे राजकीय समीकरण जुळणार का ? असे विचारले जातेय. मात्र, जलील यांच्या ऑफरनंतर शिवसेनेने स्पष्ट भूमिका घेतली असून औरंगजेबासमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत युती होऊ शकत नाही, असं शिवसेनेने म्हटलं आहे. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी तर एमआयएमला जातीयवादी तसेच रझाकारी प्रवृत्तीचा पक्ष म्हणत भगव्याला न मानणाऱ्या संघटनांशी शिवसेना जोडली जाणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं आहे.

“एमआयएम ही संघटना जातीवादी तसेच रझाकारी प्रवृत्तीची आहे. भगव्याला न मानणाऱ्या संघटनांशी आम्ही कसे जोडले जाणार ? औरंगजेबासमोर हे लोक गुडघे टेकतात. अशा संघटनेशी शिवसेना कधीही जोडली जाणार नाही. भगव्याला विरोध करणारी संघटना आहे. या विचारांशी शिवसेना कधीही तडजोड करू शकत नाही आणि या प्रस्तावाचे शिवसेनेला कोणतेही देणेघेणे नाही, असे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे म्हणाले आहेत.

तसेच सरकार आणि संघटना हा वेगळा विषय आहे. भलेही महाविकास आघाडीसोबत शिवसेना असेल पण संघटना म्हणून शिवसेनेची वेगळी विचारसरणी आहे. त्यामुळे कोणत्याही बाबतीत तडजोड करणार नाही,” अशी शिवसेनेची स्पष्ट भूमिका असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितलेय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील जलील यांच्या प्रस्तावानंतर प्रतिक्रिया दिली होती. एमआयएमसोबत जाणे शक्य नाही, असं राऊत यांनी म्हटलं होतं. “महाराष्ट्रात तीन पक्षांचेच सरकार आहे आणि तेच राहील. यात चौथा कोण पाचवा कोण यामध्ये तुम्ही कशाला पडला? शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विचारांनी चालणारे पक्ष आहेत. हेच आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या पुढे कबरीपुढे जाऊन गुढघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श आहे ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाही. एमआयएम आणि भाजपाची छुपी युती आहे हे तुम्ही उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये पाहिलेले आहे. जे आधीच भाजपाबरोबर छुप्या युतीमध्ये काम करत आहेत त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध येऊ शकत नाही,” असे संजय राऊत म्हणाले होते.