गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त संपूर्ण बीड जिल्ह्यात मंगळवारी सकाळी वाऱयासारखे पसरले आणि जिल्ह्यावर शोककळा पसरली. बीड म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि मुंडे म्हणजे बीड इतके घट्ट नाते मुंडे यांचे या जिल्ह्यासोबत होते.
मुंडे यांच्या निधनाचे वृत्त कळल्यानंतर बीड शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील दुकाने उत्स्फूर्तपणे बंद करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. भाजपचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक नक्की काय घडले, याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने तर काही थेट नवी दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत. मंगळवारी संध्याकाळी मुंडे यांचा पहिला जाहीर सत्कार बीडमध्ये करण्यात येणार होता. त्यासाठीच ते मुंबईमार्गे संध्याकाळपर्यंत बीडला पोहोचणार होते. बीड जिल्ह्याचे राजकारण गेली काही वर्षे हे मुंडे परिवाराभोवतीच फिरते आहे. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाचे वृत्त जिल्ह्यातील सगळ्यांनाच चटका लावणारे आहे.