अपक्ष उमेदवार रोहन देशमुख, तसेच महायुतीचे प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर दोघांवरही आचारसंहिता भंगाचे गुन्हे नोंदविण्यात आले. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन शक्कल लढविली आहे. खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी केल्या जाणाऱ्या शक्तिप्रदर्शन रॅलीस स्वखर्चाने उपस्थित राहा, असे आवाहन राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आले आहे.
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. बुधवापर्यंत (दि. २६) अर्ज दाखल करता येईल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लगबग सुरू केली आहे. तिरंगी लढतीचे दावेदार मानल्या जाणाऱ्या लोकमंगलच्या रोहन देशमुख यांनी अपक्ष म्हणून, तर महायुतीकडून प्रा. गायकवाड यांनी अर्ज दाखल केले. दोन्ही उमेदवारांनी मोठय़ा प्रमाणात शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले. मात्र, शक्तिप्रदर्शनात वापरल्या गेलेल्या वाहनांचा परवाना नसेल, खर्चाचे अंदाजपत्रक व झालेला खर्च वेळेत न सादर करणे, मतदारांना प्रभावित करण्यासाठी त्यांना जेवणावळी देणे, वाहतूक व्यवस्थेत अडथळा अशा अनेक कारणांवरून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही उमेदवारांवर आदर्श आचारसंहितेचा गुन्हा नोंदविला आहे.
प्रतिस्पर्धी उमेदवारांवर गुन्हे व आचारसंहिता कालावधीत अचानक गतिमान झालेले प्रशासन पाहून राष्ट्रवादीने सावध पवित्रा घेतला आहे. खासदार डॉ. पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात येणाऱ्या रॅलीत स्वखर्चाने सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन करून प्रशासनालाच बुचकळ्यात टाकले आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तुलनेत डॉ. पाटील यांचे समर्थक मोठय़ा संख्येने रस्त्यावर येणार, हे स्पष्ट आहे. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गाडय़ांचा ताफा व इतर लवाजमा यांचा अंदाज बांधणेही जिकिरीचे आहे. रॅलीच्या खर्चाचे अंदाजपत्रक अथवा त्यानंतर शक्तिप्रदर्शनास झालेला खर्च यांचा मेळ घालण्याची वेळ येऊ नये म्हणून राष्ट्रवादीकडून ही शक्कल लढविली गेली आहे.
डॉ. पाटील उद्या (मंगळवारी) अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी मोठे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. ज्या कार्यकर्त्यांला शक्तिप्रदर्शनात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी सकाळी १० वाजता तुळजापूर नाका येथील अण्णा भाऊ साठे चौकात स्वखर्चाने उपस्थित राहून रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केले. दुपारी १ वाजता डॉ. पाटील अर्ज दाखल केल्यानंतर शहरातील लेडीज क्लब येथे जाहीर सभा होईल. कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे, असे आवाहन केल्यामुळे शक्तिप्रदर्शन रॅलीत वापरल्या जाणाऱ्या वाहनांचा खर्च पक्षाच्या उमेदवाराचा की सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या नावासमोर टाकावयाचा, असा नवा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
रॅलीत सर्वसामान्य नागरिक आहेत की कार्यकत्रे याची सत्यता तपासली जाईल. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले सर्वच निकष स्पष्ट आहेत. त्यामुळे कायद्याने ठरवून दिल्याप्रमाणे वर्तन होत आहे की नाही यावर लक्ष ठेवले जाईल. कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कारवाई जरूर केली जाईल. त्यासाठी अगोदर कृती घडू द्यावी लागेल. तत्पूर्वी भाष्य करणे उचित होणार नाही. मात्र, कायद्याची अंमलबजावणी करणे ही प्रशासनाची, तर कायद्याचे पालन करणे सर्वाची जबाबदारी आहे, असे जिल्हाधिकारी नारनवरे यांनी स्पष्ट केले.