अहिल्यानगर : श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात टिळकनगर इंडस्ट्रीजविषयी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करत दत्तनगर, टिळकनगर, एकलहरे, रांजणखोल येथील ग्रामस्थांनी त्याचा निषेध करत, टिळकनगर, चौफुली येथे आमदार ओगले यांच्या प्रतीकात्मक छायाचित्राला ‘जोडे मारो’ आंदोलन केले.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, आमदार ओगले यांनी विधानमंडळात टिळकनगर इंडस्ट्रीजच्या बदनामीचा व अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. रिपब्लिकन पक्षाचे विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, तालुका संघटक संजय बोरगे तसेच जय भीम आर्मीचे सचिन ब्राह्मणे, राजू त्रिभुवन यांनी आमदार ओगले यांचा निषेध केला. हेमंत ओगले यांनी आपली विधानमंडळातील तक्रार त्वरित मागे घ्यावी आणि टिळकनगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर येऊन जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरोधात अधिक तीव्र व व्यापक आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देणारे निवेदन आंदोलकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपक मेढे यांना दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वेळी अशोकनगर कारखान्याचे संचालक अमर ढोकचौळे, प्रदीप गायकवाड, विशाल सुरडकर, संदीप बागुल, डॉ. सुधीर ब्राह्मणे, राजू खाजेकर, आनंद चावरे, प्रदीप कदम, शरद भनगे, रमेश ढोकचौळे, इज्जास शेख, जानाभाऊ खाजेकर, राजू त्रिभुवन, रावसाहेब ढोकचौळे आदींसह परिसरातील महिला व पुरुष उपस्थित होते.