* अपहारातील १ कोटी ३५ लाखांची रोख रक्कम जमा करण्यात पोलिसांना यश
* बँकेतील ठेवीदारांना ७० ते ८० टक्के ठेवी परत मिळण्याची आशा
सिद्धिविनायक नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना थोडासा दिलासा मिळणार आहे. बँक घोटाळ्यातील जवळपास १ कोटी ३५ लाख रुपयांची रोख रक्कम जमा करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे, तर थकीत कर्जदारांकडूनही जवळपास पावणेदोन कोटींची रक्कम वसूल झाल्याने ठेवीदारांना ७० ते ८० टक्के रकमेच्या ठेवी परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रसायनी मोहपाडा येथील सिद्धिविनायक नागरी सहकारी बँकेत १० कोटींचा घोटाळा झाल्याची बाब जानेवारी महिन्यात समोर आली होती.
यानंतर रसायनी पोलीस स्टेशनमध्ये ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्य़ाचे महत्त्व आणि ठेवीदारांचे हित लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने रायगडच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे वर्ग केला होता. यानंतर या प्रकरणातील सर्व आरोपींची धरपकड करण्यात आली होती.
तपासाच्या सुरुवातीला आरोपींची संख्या ३४ होती. मात्र तपासानंतर ही संख्या ४० वर गेली. पोलीस तपासात बँकेत क्लार्क म्हणून कामास असणाऱ्या राकेश तिरसे यांनी अध्यक्षांच्या मदतीने घोटाळा केल्याचेही निष्पन्न झाले. बँकेत अपहार करून गोळा केलेल्या रकमेतून तिरसे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्यवसायात प्रवेश केला. याच पैशातून त्याने डोंबिवली येथे २ बिल्डिंग, १ फ्लॅट खरेदी केला, तर मालवण तालुक्यातील कुंभार येथे ४० गुंठे जागा खरेदी केली. तिरसे यांची सर्व मालमत्ता आता स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने जप्त केली आहे.
दुसरीकडे बँक अपहारातील तब्बल १ कोटी ३५ लाख रुपयांची रोख रक्कम जमा करण्यात पोलिसांना यश आले आहे. अजूनही जवळपास ५० लाख रुपयांची रोख रक्कम जमा होण्याची शक्यता स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी व्यक्त केली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँकेच्या थकीत कर्जदाराकडून तब्बल पावणेदोन कोटींची रक्कमही वसूल करण्यात पोलीस आणि बँक प्रशासकांना यश आले आहे.
त्यामुळे बँकेतील ठेवीदारांच्या एकूण ठेवींपैकी ७० ते ८० टक्के रक्कम परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. ठेवीदारांसाठी ही नक्कीच दिलासादायक बातमी आहे.
सुमारे सहाशे कोटींच्या पेण अर्बन बँक घोटाळ्यात पोलिसांना केवळ ५० ते ६० लाख रुपयांची रक्कमच गोळा करता आली होती.
मात्र सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तपास केला तर अपहार केलेली रक्कमही जमा केली जाऊ शकते हे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने दाखवून दिले आहे.
या तपासात बँकेचे प्रशासक संदीप गोठिवेरेकर, जी. एस. ठाकूर यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे संजय पाटील यांनी सांगितले, तर पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी तपासात मोलाचे मार्गदर्शन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.