सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा वन विभागाने दुर्मिळ वनस्पती आणि झाडांच्या संवर्धन व रोपवनाला प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून, चौकुळ येथील वन जंगलात येत्या ऑगस्ट महिन्यात बहुमोल औषधी वनस्पती ‘सप्तरंगी’ च्या सुमारे १ हजार रोपांचे रोपण केले जाईल, अशी माहिती उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांनी दिली.
पश्चिम घाटातील महत्त्वाची औषधी वनस्पती
सप्तरंगी ही प्रामुख्याने पश्चिम घाटात आढळणारी एक महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. भविष्यात औषधी वनस्पतींचे संवर्धन करण्याची गरज ओळखून वन विभागाने या लागवडीचे नियोजन केले असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.
मधुमेहावरील प्रभावी औषध
सप्तरंगीचा उपयोग मधुमेहावर औषध म्हणून केला जातो. महाराष्ट्रात काही ठिकाणी तिला ‘इंगळी’ किंवा ‘निसूल’ या नावानेही ओळखले जाते, असे औषधी वनस्पती जाणकारांनी नमूद केले आहे.
सप्तरंगीचे औषधी गुणधर्म आणि उपयोग
मधुमेह नियंत्रणासाठी सप्तरंगी ही मधुमेहावर अत्यंत गुणकारी मानली जाते. तिच्या मुळांमध्ये, खोडात आणि पाना-बियांतही औषधी गुणधर्म असल्याने मधुमेहावरील औषधांमध्ये तिचा वापर होतो. काही संशोधनातून असे दिसून आले आहे की सप्तरंगीच्या मुळांमध्ये आढळणारे गुणधर्म खोडातही असतात, त्यामुळे झाड न तोडता खोडाचा वापर करता येतो.
सप्तरंगीच्या बियांची उगवण क्षमता कमी असल्याने आणि तिची वाढ संथ गतीने होत असल्याने ती दुर्मिळ होत चालली आहे. मधुमेहावरील उपचारात तिची जास्त मागणी असल्याने औषधांच्या दुकानात आणि बाजारात ती सहजासहजी उपलब्ध होत नाही. त्यामुळे या औषधी वनस्पतीचे जतन करणे अत्यंत आवश्यक असून, वन विभागाने यावर लक्ष केंद्रित केले आहे.