‘किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव ३५० वर्षांचा’ या भव्यदिव्य कार्यक्रमाने छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे आरमार आणि युद्धकौशल्य येत्या २२ ते २४ एप्रिलदरम्यान मालवण येथे पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाच्या उद्घाटनास येणार आहेत. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव ३५० वर्षांचा या कार्यक्रमाचे आयोजन २२ ते २४ एप्रिल दरम्यान किल्ले सिंधुदुर्ग व टोपीवाला बोर्डिग मैदान, मालवण येथे आयोजित करण्यात आले आहे.
प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे यांनी ही माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष ज्योती तोरसकर, दत्तात्रय नेरकर, सचिव विजय केनवडेकर, सहसचिव गणेश कुशे, हेमंत वालकर, भाऊ सामंत, डॉ. रामचंद्र काटकर आदी उपस्थित होते.
२१ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण बाजारपेठमार्गे भव्य शिवप्रेरणा यात्रा काढण्यात येणार आहे. २२ रोजी सकाळी ६ वाजता दांडी वायरी येथील मोरयाचा धोंडा येथे गणेश पूजन होणार आहे. २२ ते २४ एप्रिल या कालावधीत किल्ले सिंधुदुर्ग येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वा. या वेळेत शिवकालीन युद्धकलांचा थरार सादर केला जाणार आहे. शिवशौयरेत्सव कार्यक्रमात अडीचशे कलाकार सहभागी होणार आहेत. शिवछत्रपती मालिकेचे दिग्दर्शक विजया राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे.
२२ एप्रिल सायंकाळी ६.३० वा. बोर्डिग मैदान येथे भारतातील युद्धकलेचे प्रदर्शन शौर्यकला हा कार्यक्रम केरळ, मणीपूर, पश्चिम बंगल, झारखंड, आसाम, उत्तर प्रदेश, ओडिसा आदी राज्यांतील १०० कलाकार सादर करणार आहेत.
२३ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वा. शाहीर नंदेश उमप आणि सहकारी यांचा शिवसोहळा कार्यक्रम होणार आहे. २४ एप्रिल रोजी ६.३० वा. शिवस्तुती हा स्फूर्तिदायक गीतांचा संगीतमय कलाविष्कार प्रसिद्ध कलाकार सुवर्णा माटेगावकर, पराग माटेगावकर, संदीप उबाळे सादर करणार आहेत. या तीन दिवसांच्या महोत्सवात सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे सकाळी ९ ते रात्री ८ वा. रांगोळी, शिवकालीन नाणी, किल्ले छायाचित्र, ऐतिहासिक संदर्भग्रंथ, पुस्तके यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. चिवला बीच येथे वाळुशिल्प प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. येथे शिवाजी महाराजांचे वाळूशिल्प साकारण्यात येणार आहे.
किल्ले सिंधुदुर्ग महोत्सवानिमित्त खाद्यसंस्कृती पर्यटक या शिवप्रेमीत पोहचावी म्हणून बोर्डिग मैदानावर फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. प्रेरणोत्सव समिती अध्यक्ष गुरुनाथ राणे- ९४०३९३८३१८ यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sindhudurg fort devendra fadnavis
First published on: 14-04-2016 at 01:56 IST