सोमवारी ८ नोव्हेंबर रोजी राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाला ७ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता आर. आर. पाटील यांनी आपल्या फेसबुकवर भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये स्मिता पाटील यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच, ८ नोव्हेंबर २०१४ रोजी आर. आर. पाटील घरातू निघाले, त्या वेळच्या आठवणी त्यांनी या फेसबुक पोस्टमध्ये लिहिल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांची ही पोस्ट व्हायरल होत असून आर. आर. पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यावर कमेंट्स करून आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे ही पोस्ट?

स्मिता पाटील यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय, “आज ८ नोव्हेंबर … बरोबर ७ वर्ष झाली माझ्या वडिलांना आज घरातून शेवटचे बाहेर जाऊन! आजच्या दिवशी २०१४ मध्ये सकाळी ११ वाजता माझ्या वडिलांनी घर सोडले. काही दिवस दिल्लीला विश्रांतीसाठी निघालोय असं पप्पांनी माझ्या आजीला सांगितले होते. ३ नोव्हेंबरला नवीन विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पप्पांनी अत्यंत घणाघाती भाषण केले होते. या भाषणाचे महाराष्ट्र विधानसभेने टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले होते”, अशा शब्दांत त्यांनी आठवणींना उजाळा दिला आहे.

स्मिता पाटील पुढे म्हणतात, “६ नोव्हेंबरला पप्पा अंजनीला घरी आले. हेलिकॉप्टरमधून सगळं गाव दोन – दोनदा फिरून बघितले. घरातून बाहेर जाताना पप्पा नेहमी उपस्थित सर्व लोकांना अभिवादन करत असत. त्याचप्रमाणे खिडकीतून सर्व कुटुंबियांकडे बघून जात असत. त्या दिवशी मी व माझी बहिण सुप्रिया, आम्ही वरती आमच्या रूममध्ये होतो. तर पप्पांनी त्या दिवशी वरती येऊन आम्हा दोघा बहिणींना घट्ट मिठी मारली. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले होते”.

‘त्या’ प्रकरणाशी आर. आर. पाटील यांचा संबंध नव्हता – देवेंद्र फडणवीसांचा खुलासा!

“पप्पांना मृत्यू आधीच दिसला होता का?”

आपल्या वडिलांची ही आठवण सांगताना त्यांना मृत्यू आधीच दिसला होता का, असं या पोस्टमध्ये स्मिता पाटील यांनी म्हटलं आहे. “आम्ही दोघी बहिणी विचार करू लागलो की पप्पांना काय वाटले असावे की पप्पांनी मिठ्ठी मारली? प्पपांच्या डोळ्यांत का पाणी उभारले असावे? पण आम्हाला वाटले नव्हते की, आज पप्पांनी आम्हाला शेवटचे कुशीत घेतले असावे. त्या दिवशी पप्पांनी गावच्या मारूती – शंकराचेही न चुकता दर्शन घेतले होते. स्वतःच्या गावात चावडीसमोर निवडून आल्याबददल सत्कार स्वीकारताना पप्पा म्हणाले होते की, स्वतःच्या गावाकडून हा माझा शेवटचा सत्कार ठरावा! आता आणखी किती सत्कार करणार? मृत्यु पप्पांना अधीच दिसला होता का?”, अशा शब्दांत स्मिता पाटील यांनी आर. आर. पाटील यांच्याविषयीच्या आपल्या भावना या पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत.

स्मिता पाटील यांची ही फेसबुक पोस्ट सोशल मीजियावर व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smita patil emotional post on r r patil death anniversary 8 the november pmw
First published on: 09-11-2021 at 19:33 IST