…म्हणून मी शिवसेनेबद्दल असं म्हणालो की यांनी आमचा विश्वासघात केला – चंद्रकांत पाटील

“प्रामाणिकपणे साथ देणाऱ्या मित्रपक्षांसह भाजपा आगामी निवडणूक लढेल आणि जिंकेलसुद्धा.”असं देखील म्हणाले आहेत.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

“दिवसेंदिवस भाजपाचे संघटन मजबूत होत आहे. भाजपा सोबत आजतागायत प्रामाणिकपणे साथ देणाऱ्या मित्रपक्षांसह भाजपा निवडणूक लढेल आणि जिंकेलसुद्धा.” असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. याचबरोबर, त्यांनी आपण शिवसेनेने आमचा विश्वासघात केला असल्याचं का म्हणालो याचं देखील स्पष्टीकरण दिलं. जालना येथे ते माध्यमांशी बोलत होते.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, “भाजपा आता स्वतःच्या पायावर मजबूत होत चालली आहे. प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे, मोठ्याप्रमाणावर संघटन निर्माण होत आहे. ज्यांनी मोदींच्या नावाने मतं मागितली, भाजपाचं पाच वर्षे उत्तम राज्य चाललं त्याच्या आधारे त्यांनी मत मिळवली आणि ५६ वर मुख्यमंत्री झाले, ५४ वर उपमुख्यमंत्री झाले आणि ४४ वर महसुलमंत्री झाले. अशा विश्वास घातक्यांबरोबर आम्हाला काम करायचं नाही.”

तसेच, “त्यामुळे भाजपा आगामी नगरपालिका जेव्हा केव्हा होतील त्या नगरपालिका, पंचात समिती, जिल्हा परिषद, महापालिका, विधानसभा, लोकसभा या सगळ्या निवडणुका आपल्यासोबत जे पक्ष प्रमाणिकपणे आहेत. जे आमच्यावर खूप प्रेम करतात, जे आमच्याशी दगाबाजी नाही करत, असे मग सदाभाऊ खोत, रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे, विनय कोरे या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही एकट्याच्या जीवावर निवडणुका लढवणार आणि जिंकणार. एवढी सगळी निवडणुकपूर्व अदृश्य युती करून देखील आमच्या १०५ जागा आल्या आहेत, कमी नाही आल्या आणि परवा पंढरपूरमध्ये तर खुलेपणाने तिघे विरोधात होते तरी आम्ही ती निवडणूक जिंकली. म्हणून मी युतीबद्दल शिवसेनेबद्दल असं म्हणालो की, यांनी आमचा विश्वासघात केला. त्यामुळे यापुढील निवडणुका स्वतःच्या ताकदीवर लढेल.” असं देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलून दाखवलं.

“पोपटाचा प्राण सत्तेमध्ये आहे!; पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी…”

काल भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, “पोपटाचा प्राण सत्तेमध्ये आहे!; पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी मुंबई महानगरपालिका जिंका आणि महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणा, हेच एकमेव उत्तर आहे.” तसेच, अरविंद सावंत यांनी भाजपाची मदत न घेता मुंबईत खासदार होऊन दाखवावं, असं जाहीर आव्हान देखील त्यांनी यावेळी दिलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: So i said about shiv sena that they betrayed us chandrakant patil msr

ताज्या बातम्या