सोलापूर : दत्तात्रेयाचे चौथे अवतार मानल्या गेलेल्या अक्कलकोटनिवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४७ वा पुण्यतिथी सोहळा स्वामीनामाच्या जयजयकाराने भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यानिमित्ताने सुमारे अडीच लाख भाविकांच्या गर्दीने अक्कलकोट नगरी फुलून गेली होती.अंगाची लाही लाही करणारा तप्त उन्हाळा असूनही त्याची पर्वा न करता स्वामिभक्तीपोटी अक्कलकोट नगरीत भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. श्री स्वामी समर्थ दर्शन सुलभतेने होण्यासाठी वटवृक्ष श्री स्वामी महाराज देवस्थान समितीने नेटके नियोजन केले होते. स्त्री आणि पुरुष भाविकांसाठी दोन स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात आल्याने दर्शन सुलभ झाले. उन्हाची झळ बसू नये म्हणून दर्शनरांगेत चटई आणि सावलीसाठी कापडी मंडपाची उभारणी करण्यात आली होती. दर्शनाबरोबरच भाविकांसाठी भक्तनिवास, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे यात्री निवास, राजेराय मठासह अनेक ठिकाणी निवास व्यवस्था उपलब्ध झाल्याने भाविकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

वटवृक्ष श्री स्वामी समर्थ देवस्थानात पहाटे दोन वाजता काकड आरती, नामस्मरण, नगर प्रदक्षिणा, श्री स्वामी महाराजांना लघुरुद्र अभिषेक अशा विविध धार्मिक विधींनी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळ्यास प्रारंभ झाला. दुपारी अक्कलकोट संस्थानचे मालोजीराजे भोसले यांनी संस्थानाच्यावतीने श्री स्वामी महाराजांना पूर्वापार परंपरेनुसार महानैवेद्य अर्पण केला. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे व सचिव आत्माराम घाटगे उपस्थित होते. त्यानंतर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्यावतीनेही श्रींना महानैवेद्य अर्पण करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आदींनी श्रींचे दर्शन घेतले.

यंदा पहाटेपासूनच श्रींच्या दर्शनासाठी स्थानिक व परगावच्या भाविकांची गर्दी उसळली होती. तहसीलदार विनायक मगर यांनी गर्दीवर नियंत्रणासाठी स्वतंत्र व्यवस्था प्रणाली अमलात आणली होती. दुपारनंतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली.

(अन्नछत्र मंडळात महाप्रसाद सेवा)

वटवृक्ष श्री स्वामी महाराज देवस्थानालगत असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात एक लाखापेक्षा जास्त भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत ही सेवा सुरू होती. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या अधिपत्याखाली महाप्रसादाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. सकाळी विविध धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते संकल्प सोडण्यात आला. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाची सेवा रुजू करण्यात आली.