सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात तोतया डॉक्टरांची संख्या सुमारे २५० च्या घरात असून, त्या तुलनेत प्रशासनाकडून कारवाईत सातत्य दिसून येत नाही. सोलापूर शहरात सुमारे १०० तोतया डॉक्टर कार्यरत असल्याचा अंदाज आहे. महापालिका प्रशासन याबाबत अधूनमधून जागे होऊन एखाद-दुसऱ्या कारवाईचा बडगा उगारते. रविवार पेठेत एक तोतया डॉक्टर सापडला असून, त्याच्या विरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

शहराच्या बहुतांश झोपडपट्ट्या, जुन्या कामगार चाळी, गलिच्छ वस्त्यांमध्ये तोतया डॉक्टरांचा वावर दिसून येतो. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात तोतया डॉक्टरांच्या विरोधात कारवाईची व्यापक मोहीम आखण्यात आली होती. त्या वेळी सुमारे २५० तोतया डॉक्टरांची संख्या समोर आली होती. नंतर कारवाईमध्ये सातत्याचा अभाव राहिल्यामुळे तोतत्या डॉक्टर पुन्हा सक्रिय होऊन बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करतात. तीन-चार महिन्यांत एकदा एखाद-दुसऱ्या तोतया डॉक्टरविरुद्ध कारवाई केली जाते.

हेही वाचा…सोलापुरात सर्वाधिक ३.७४ लाख मतदार अक्कलकोटमध्ये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी तोतया डॉक्टरांच्या विरोधात कारवाईची मोहीम राबविण्याचे आदेश दिल्यानंतर पालिका आरोग्य यंत्रणा जागी झाली आहे. त्यातून रविवार पेठेत राजरोसपणे सुरू असलेल्या संजीवनी क्लिनिकची तपासणी केली असता हे क्लिनिक राहुल नरसिंगराव रापर्ती हे डॉक्टर म्हणून चालवत असल्याचे दिसून आले. वैद्यकीय प्रमाणपत्राबाबत घेतलेल्या माहितीनुसार, त्यांनी आवश्यक कायदेशीर वैद्यकीय शैक्षणिक अर्हता पूर्ण केली नसल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या विरुद्ध पालिका आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अलकुंटे यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स कायद्यानुसार फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे.