scorecardresearch

“भाजपामध्ये महिलांना मान-सन्मान मिळत नाही”, BJP जिल्हाध्यक्षांचा VIDEO व्हायरल झाल्यानंतर यशोमती ठाकूर यांचं टीकास्त्र!

श्रीकांत देशमुख यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

shrikant deshmukh bjp yashomati thakur inc
भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर…(प्रातिनिधीक फोटो)

भारतीय जनता पार्टीचे सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. संबंधित व्हिडीओत एका महिला श्रीकांत देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहे. देशमुख यांना बायको असताना देखील त्यांनी आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, असा दावा महिलेनं केला आहे. हा व्हिडीओ एका हॉटेल सदृश्य खोलीतील असून त्यामध्ये श्रीकांत देशमुख देखील आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

भारतीय जनता पार्टीत महिलांना मान-सन्मानाची वागणूक मिळत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना ठाकूर म्हणाल्या की, “आम्ही भाजपाच्या जिल्हाध्यक्षांचा प्रकार बघितला. मान खाली घालायला लावणारा हा प्रकार आहे. हा प्रकार पाहिल्यानंतर मला चित्राताईंची फार आठवण झाली. चित्राताई आता यावर प्रतिक्रिया देणार की नाही? असा प्रश्न पडला.”

भाजपावर टीका करताना पुढे त्या म्हणाल्या, “एकंदरीत आपण पाहिलं तर चंद्रकांत पाटील म्हणतात महिलांनी स्वयंपाक घरात जायला पाहिजे. यानंतर आता जिल्हाध्यक्ष अशी प्रकरणं करत आहेत. तसंही तुम्ही बघितलं तर ते ज्या पक्षाचे आहेत, त्या पक्षात महिलांना फार मान-सन्मान असतो, अशातला हा भाग नाहीये. आता पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी, पण अशी प्रकरणं लज्जास्पद आहेत. तेही सोलापूर सारख्या शहरात जिथे पांडुरंगाच्या दर्शनाला आम्ही आलो आहोत, तिथला भाजपाचा जिल्हाध्यक्ष अशा प्रकारची कृत्यं करतो, हे निषेधार्य आहे,” असंही ठाकूर म्हणाल्या.

हेही वाचा- भाजपा पदाधिकारी श्रीकांत देशमुखांवर महिलेचे गंभीर आरोप; हॉटेलमधील VIDEO आला समोर

पुढे त्यांनी म्हटलं, “आता यामध्ये गंमत अशी आहे की, सगळ्यांना एकापाठोपाठ एक क्लीन चीट मिळतेय. त्यामुळे आपण त्यांना ‘क्लीन चीट’ सरकार म्हटलं पाहिजे का? हे ‘ईडी सरकार’ तर आहेच. आधी ईडी लावायची, मग क्लीन चीट द्यायची. या सगळ्या गोष्टी संविधानाला आणि लोकशाहीला तडा देणाऱ्या आहेत. त्यांमुळे जनसामान्यांनी विचार करायला हवा. जो संविधानाचं आणि संस्कृतीचं पालन करतो, त्याच्या पाठीमागे उभं राहायला.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-07-2022 at 15:46 IST
ताज्या बातम्या