सोलापूर : सोलापुरातील एका महिला डॉक्टरला जादा परताव्याची भुरळ पाडून १७ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा शोध सोलापूर शहर सायबर पोलीस घेत आहेत.
संबंधित महिला डॉक्टरला अनोळखी क्रमांकाचा मोबाइल कॉल आला. समोरच्या व्यक्तीने ऑनलाइन गुंतवणूक केल्यास १५ ते २० टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यावर विश्वास ठेवून महिला डॉक्टरने सुरुवातीला २० हजार रुपये गुंतविले. त्यानंतर वेळोवेळी मिळून १७ लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यासाठी त्यांनी आपल्या काही नातेवाइकांकडून पैसे उसने घेतले. सायबर गुन्हेगार असलेल्या समोरच्या व्यक्तीने गुंतवणूक झालेल्या रकमेवर जादा परतावा आभासी पद्धतीने दर्शविला.
यात एकूण २५ लाखांपेक्षा जास्त रक्कम दर्शविली जात होती. तेव्हा महिला डॉक्टरने संपूर्ण रक्कम काढण्याचा पर्याय निवडला. तेव्हा समोरच्या व्यक्तीने, संपूर्ण रक्कम काढायची असेल तर तेवढ्या रकमेवर प्राप्तिकर भरावा लागेल, अशी अट घातली. शेवटी हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच महिला डॉक्टरने सायबर पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद नोंदविली.
पोलिसांनी लगेच तपासाची चक्रे वेगाने फिरविली आणि सायबर गुन्हेगाराने एका बँक खात्यात ठेवलेली साडेपाच लाखांची रक्कम गोठविली. नंतर न्यायालयाच्या आदेशानुसार ही रक्कम महिला डॉक्टरला परत मिळाली. सायबर भामटे राजस्थान आणि दिल्लीचे असल्याचे आणि त्यांचा शोध घेतला जात असल्याचे सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी सांगितले.
कांदा व्यवहार, तीन कोटींची फसवणूक
सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये एका कांदा विक्रेत्याकडून ओळखीने दोन कोटी ९१ लाख ५७ हजार रुपये किमतीचा ३२ हजार ४९२ पिशवी कांदा खरेदी केला. परंतु त्याची रक्कम जमा न करता संबंधित व्यापाऱ्याची फसवणूक केली. याबाबत प्रेमनाथ दत्तात्रय कदम (वय ४४, रा. शेळगी, सोलापूर) यांनी जेल रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हा फसवणुकीचा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते एप्रिल २०२२ या काळात घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे तपास करीत आहेत.