Ganeshotsav 2025 : पंढरपूर: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान आवाजाच्या भिंती आणि प्रखर विद्युत झोत अर्थात लेझर लाईटच्या वापरास बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांना मिरवणुकीमध्ये आवाजाच्या भिंती आणि प्रखर विद्युत झोताचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केली असल्याची माहिती पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यामध्ये गणेश उत्सव सण पारंपरिक पध्दतीने व मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात येते. या मिरवणुकीमध्ये गणेश उत्सव मंडळाकडून मोठ्या आवाजाच्या भिंती अर्थात डॉल्बी सिस्टीम व प्रखर विद्युत झोत अर्थात लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीवेळी मिरवणूक बघण्याकरिता आलेल्या काही भाविकांना कर्णकर्कश आवाजामुळे कानाचा व छातीचा त्रास होऊन कायमचे अपंगत्व अथवा जीवितास धोका निर्माण झाल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या होत्या. तसेच प्रखर विद्युत झोत अर्थात लेझर लाईटच्या वापर डोळ्यावर पडल्यास वयोवृद्ध व लहान मुलांच्या डोळ्याचा पडद्याला तसेच बुबळाला इजा झालेल्या घटना घडलेल्या आहेत.

त्यामुळे मिरवणुकीमध्ये आवाजाच्या भिंती आणि प्रखर विद्युत झोताच्या वापरास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. भारतीय नारिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१ ) अन्वये, प्राप्त अधिकारानुसार २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत सोलापूर जिल्ह्यामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून आयोजित मिरवणुकीमध्ये मिरवणुकीदरम्यान डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा शो वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. अशी माहिती प्रांताधिकारी इथापे यांनी दिली.