सोलापूर : सुमारे दीड-दोन महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर सोमवारी सुरू झालेल्या शाळांमध्ये सकाळी विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला. नव्या उमेदीसह उत्साहाने भारलेल्या वातावरणात सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यासाठी आमदारांपासून ते जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सरसावले. त्यामुळे वातावरण उत्साही आणि भारावलेले दिसून आले.
सजविलेल्या स्वागत कमानी, चिमुकल्या विद्यार्थ्यांचे पाय रंगांमध्ये बुडवून पायाचे ठसे घेण्यात दंग असलेल्या शिक्षिका, शाळेत पहिले पाऊल ठेवण्यासाठी बालकांची आणि पालकांची सुरू झालेली धडपड, गुलाबाच्या फुलांनी झालेले स्वागत असा माहोल शाळांमध्ये पाहायला मिळाला. काही शाळांमध्ये तर विद्यार्थ्यांचे स्वागत चक्क जेसीबी यंत्राद्वारे झालेल्या फुलांच्या उधळणीने झाले.
सकाळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूरजवळील देगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पोहोचले. जिल्हाधिकारी स्वतः शाळेत स्वागतासाठी हजर झाल्याने आणि त्यांची शारीरिक उंची साडेसहा फूट एवढी मोठी असल्याने त्यांच्याविषयी चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण निर्माण झाले होते. कुमार आशीर्वाद यांनी लहान मुलांच्या बरोबरीने छबी टिपून घेण्यासाठी चक्क जमिनीवर फतकल मारली. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांशी प्रेमाने हितगूज केले. यावेळी शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी कृत्रिम बाल अंतराळवीर आले होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अ. कादर शेख हे उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी शाळा प्रवेशोत्सवानिमित्त मोहोळ तालुक्यातील पापरी शाळेत जाऊन पहिलीच्या नव्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटामध्ये कुलदीप जंगम रमले होते. तर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी मजरेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेत पोहोचून नवोदित विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन उत्साहाने स्वागत केले. शाळेत स्वागतासाठी पोलीस आयुक्त दाखल झाल्याने विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांचा आनंद द्विगुणित झाला.
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील कन्नड मुलींच्या शाळेत जाऊन पहिल्या दिवशी चिमुकल्या विद्यार्थिनींचे स्वागत केले. तर दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथील जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि या भेटीचे औचित्य साधून वृक्षारोपणही केले. मोहोळचे आमदार राजू खरे मोहोळ तालुक्यातील शाळेत हजेरी लावत चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पुढे आले. सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी आपापल्या मतदारसंघातील शाळांना भेटी देऊन नवोदित विद्यार्थी बालकांचे स्वागत केले. सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पत्नी डॉ. निकिता देशमुख यांच्या हस्ते पेनूर येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या पहिलीच्या विद्यार्थ्यांचे प्रेमाने स्वागत केले.
यानिमित्ताने जवळपास सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि उमेद पहावयास मिळाली. शिक्षक आणि पालकांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसून आले.
पापरी शाळेचा पॅटर्न
सोलापूर जिल्ह्यात खासगी शाळांची संख्या वाढत असताना मोहोळ तालुक्यातील पापरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या लक्षणीय स्वरूपात वाढून ८२४ झाली आहे. ही पटसंख्या एक हजारापर्यंत वाढवण्याचा मानस शाळेतील शिक्षकांनी करून त्यानुसार विद्यार्थ्यांची नोंदणीही केली आहे. याबद्दल मुख्याध्यापक, वर्ग शिक्षिका आणि पालकांचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अभिनंदन केले. या माध्यमातून पापरी जिल्हा परिषद शाळेचे पॅटर्न निर्माण केल्याचे उद्गार त्यांनी काढले.
सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके वाटप
सोलापूर जिल्ह्यात एकूण २७७७ शाळा असून, त्यात दोन लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेशित आहेत. शासनाने समग्र शिक्षा योजनेअंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी वाटप करण्याचा संकल्प सोडला होता. त्यानुसार जिल्ह्यात एकूण २१ लाख ५४ हजार ९४१ पाठ्यपुस्तके वाटप करण्याचे नियोजन आखण्यात आले. त्याप्रमाणे हे नियोजन यशस्वी झाले आहे. याशिवाय सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश, बुटाचा जोड आणि पायमोजाचे दोन जोड वाटप करण्यात आले आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.-अ. कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद