सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढत असतानाच मंगळवारी हिंदू नववर्ष आणि गुढी पाडव्याचे औचित्य साधून निघालेल्या शोभायात्रेत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते हे दोन्ही तगडे उमेदवार आमनेसामने आले. तेव्हा दोन्ही बाजूंनी घोषणांच्या तुंबळ युध्दाला तोंड फुटले.

बाळीवेस भागातून निघालेल्या या शोभायात्रेचे आयोजन संघ परिवाराशी संबंधित मंडळींकडून करण्यात आले होते. रथावर प्रभू श्रीरामाची मूर्ती विराजमान होती. शोभायात्रेला प्रारंभ होण्यापूर्वी तेथे भाजपचे उमेदवार राम सातपुते हे आले. त्या पाठोपाठ काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे दाखल झाल्या. एकमेकांविरूध्द कडवी झुंज देणारे हे दोन्ही उमेदवार आमनेसामने येताच घोषणांचे तुबबळ युध्द माजले. अर्थात या शोभायात्रेवर संघ परिवाराचा प्रभाव असल्यामुळे जय श्रीरामच्या घोषणांचे बाण सोडण्यात आले. रथावरून काही कार्यकर्त्यांनी ‘जो हिंदूहित की बात करेगा, वही देशपर राज करेगा’ अशा घोषणा वारंवार दिल्या. यावेळी आमदार सातपुते यांना भाजप व संघ परिवारातील कार्यकर्त्यांनी फेटा बांधून खांद्यावर उचलून घेतले. जय श्रीरामची नारेबाजी स्वतः सातपुते यांच्याकडून त्वेषाने झाली. त्यासाठी त्यांच्या हातात ध्वनिक्षेपक देण्यात आला होता.

हेही वाचा : राज ठाकरेंची मोठी घोषणा! “फक्त नरेंद्र मोदींसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा!”

याउलट, भाजप व संघ परिवाराची घोषणाबाजी वाढली असताना काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या समर्थकांनी प्रत्युत्तरादाखल घोषणा दिल्या. जय भवानी जय शिवाजी, भारत माता की जय, अशा घोषणा देताना काँग्रेससह शिवसेना उध्दव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्ते तुटून पडले. आमदार प्रणिती शिंदे हास्यवदनाने, शालीनपणे सर्वांना हात जोडून नमस्कार करीत होत्या. प्रणिती शिंदे यांनीही जय श्रीरामचा नारा दिला.