एजाज हुसेन मुजावर, सोलापूर

एकेकाळी काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या गेलेल्या सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीसाठी यंदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी निश्चित समजली जात असून सोलापुरात तळ ठोकून शिंदे हे जनसंपर्क वाढवत आहेत. मागील २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत शिंदे यांना भाजपकडून पराभवाची मोठी नामुष्की पत्करावी लागली होती. या पराभवाचा वचपा काढण्याचा चंग शिंदे यांनी बांधलेला दिसतो. तर दुसरीकडे भाजपने पुन्हा विजयासाठी पुन्हा शिकस्त चालविली आहे. त्यासाठी विद्यमान खासदार अ‍ॅड्. शरद बनसोडे यांचा निभाव लागणार नाही हे गृहीत धरून वीरशैव लिंगायत समाजातील शिवाचार्य डॉ. जयसिद्धेश्वर महाराजांची उमेदवारी पुढे आणण्याचा खटाटोप भाजपच्या वर्तुळात सुरू आहे. मात्र स्थानिक पातळीवर भाजपअंतर्गत पालकमंत्री विजय देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यातील गेली पाच वर्षे पाहावयास मिळालेली कमालीची गटबाजी बाजूला ठेवून त्यांचे मतैक्य कसे साधले जाणार, यावर भाजपचे भवितव्य अवलंबून आहे. तर गेली ४५ वर्षे चालत आलेल्या ‘सुशीलकुमार शिंदे आणि सोलापूर’ या समीकरणाला यंदा पुन्हा दुसऱ्यांदा धक्का बसणार का आणि शिंदे यांची सद्दीच संपणार, याचाच निकाल देणारी ही लोकसभा निवडणूक ठरली आहे.

physician Dr Ravindra Harshe passed away
सातारा: सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. रवींद्र हर्षे यांचे निधन
Venkateswara Mahaswami who has stood on three Lok Sabha seats is in trouble
तीन लोकसभा जागांवर उभे राहिलेले व्यंकटेश्वरा महास्वामी अडचणीत; गुन्हा दाखल होणार
Confession of Chandrakant Patil says Madha is more difficult than Solapur
सोलापूर कमी कठीण, माढा जास्तच कठीण; चंद्रकांत पाटील यांची कबुली
cm eknath shinde kolhapur marathi news
मुख्यमंत्री शिंदे आज पुन्हा कोल्हापुरात; मंडलिक, माने यांचा अर्ज भरताना प्रकाश आवाडेंची उपस्थिती!

सोलापूर आणि सुशीलकुमार शिंदे हे जणू काही समीकरणच तयार झाले होते. पण २००३ मध्ये शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यावर लोकसभा पोटनिवडणुकीत शिंदे यांच्या पत्नीचा पराभव झाला होता. यानंतर शिंदे सावध झाले. परंतु २०१४च्या मोदी लाटेत शिंदे यांचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर भाजपने सोलापूरमध्ये हातपाय पसरले. सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपनेच सत्ता खेचून आणली. मात्र त्यानंतर स्थानिक पातळीवर भाजपमध्ये दोन्ही मंत्री देशमुखांमधील प्रचंड वाढलेल्या गटबाजीमुळे पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. त्यातूनच मागील पराभवाचा डाग धुवून काढण्यासाठी शिंदे हे गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून तयारीला लागले आहेत. अलीकडे तर त्यांचा सोलापुरातील राबता सतत वाढत चालला आहे. तर इकडे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांची सुमार कामगिरी आणि बेताल वक्तव्यांमुळे त्यांची ढासळत गेलेली प्रतिमा यामुळे भाजपनेही नव्या उमेदवाराचा शोध हाती घेतला असता त्यातदेखील दोन्ही मंत्री देशमुखांमध्ये शह-प्रतिशहाचे राजकारण सुरूच राहिले. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राज्यसभेचे सदस्य अमर साबळे यांचा संभाव्य उमेदवार म्हणून वावर वाढविला, तर पालकमंत्री विजय देशमुख यांनी परका उमेदवार चालणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेत ठोस पर्याय म्हणून वीरशैव लिंगायत समाजातील शिवाचार्य डॉ. जयसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या नावाची उमेदवारी पुढे आणून पक्षांतर्गत प्रतिस्पध्र्यासह दस्तुरखुद्द काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांनाही धक्का देण्याचा प्रयत्न चालविला आहे. अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथे वीरशैव मठ असून तेथील मठाधिपती म्हणून डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी शिवाचार्य हे सर्वाना परिचित आहे. वीरशैव सांप्रदायात त्यांच्या विषयी आदर आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात वीरशैव लिंगायत समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. या समाजात भाजपचा बांधील असलेला मतदारवर्ग आहे. पद्मशाली समाजातही संघ परिवाराचे जाळे असल्याने हा समाजदेखील भाजपला जोडला गेला आहे. या दोन्ही समाजांशी काँग्रेसची नाळ बऱ्याच प्रमाणात तुटल्यात जमा आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ भाजपचा मजबूत गड आहे. लिंगायत समाजाचे असलेले पालकमंत्री विजय देशमुख हे याच मतदारसंघातून आतापर्यंत तीन वेळा निवडून आले आहेत. लोकसभेसाठी भाजपला याच मतदारसंघाचा मोठा आधार मानला जातो. अक्कलकोटमध्येही भाजपची ताकद असली तरी  तेथील गड काँग्रेसने शाबूत ठेवला आहे. दक्षिण सोलापूरमध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्यासह सर्व विरोधक एकत्र आले आहेत. सोलापूर शहर मध्य व पंढरपूर येथेही काँग्रेसची ताकद आहे. तर मोहोळ भागात काँग्रेसला राष्ट्रवादीची मदत मिळू शकते. मात्र तरीसुद्धा सुशीलकुमार शिंदे यांना ही जागा हिसकावून घेण्यासाठी मोठी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी शिंदे यांना कसा दगा दिला होता, त्याचे उदाहरण मंगळवेढय़ात पाहावयास मिळाले होते. परंतु यंदा शेजारच्या माढय़ात शरद पवार यांची स्वत:चीच उमेदवारी आल्यामुळे त्याचा मोठा आधार सोलापुरात शिंदे यांना मिळू शकतो, असा कयास व्यक्त होत आहे.

गेल्या पाच वर्षांत सोलापूरला जोडणारे पुणे-हैदराबाद, विजापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर आदी महामार्गाने जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास भरीव स्वरूपात होत आहे. पंढरपूर, तुळजापूर, अकलकोट, गाणगापूर इत्यादी तीर्थक्षेत्रांना एकमेकांना जोडण्यासाठी रस्ते विकसित होत आहेत. त्यासाठी तब्बल सुमारे २७ हजार कोटींचा खर्च होत आहे. भिगवण-सोलपूर-वाडी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरण कामाला वेग आला आहे. स्मार्ट सिटी मिशन योजनेत देशात पहिल्या दहा महानगरांमध्ये स्थान मिळाले आहे. सोलापूरच्या समांतर जलवाहिनी योजनेचेही काम सुरू होत आहे.

– अ‍ॅड्. शरद बनसोडे, खासदार

सोलापूर जिल्ह्य़ातील रस्त्यांचा विकास यापूर्वी डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळात मंजूर होऊन प्रत्यक्षात सुरू झाला होता, त्याचे उद्घाटन मात्र भाजपवाले करीत आहेत. मागील लोकसभा निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात येऊन येथील वस्त्रोद्योग क्षेत्रात तयार होणाऱ्या कापडाचा उपयोय देशातील पोलीस जवानांसाठी जरी झाला तरी तरी येथील वस्त्रोद्योगाची मोठा विकास करता आला असता, असे विधान करून त्या अनुषंगाने आश्वासन दिले होते. परंतु गेल्या पाच वर्षांत निराशाच झाली आहे. उलट, सोलापुरात  जाकिटांचे उत्पादन होत नसताना सोलापूरचे जाकीट म्हणून मोदी यांनी गौरवाने उल्लेख केला. बोरामणी विमानतळ उभारणीसाठी आपण सत्तेत असताना शासनाने दोन हजार एकर जमिनी संपादित केल्या होत्या. परंतु कोणतेही सबळ कारण नसताना बोरामणी विमानतळाचा विकास रेंगाळला आहे. उडान योजनेखाली सोलापूरची विमानसेवा सुरू करण्याची घोषणा होऊन वर्षांचा काळ लोटला तरी प्रत्यक्षात मोदी सरकारचे ‘उडान’ सोलापुरात अद्यापि हवेतच आहे. फसवणुकांचे प्रकार किती असू शकतात, ही बोलकी उदाहरणे म्हटली पाहिजेत.

– सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री