सोलापूर : करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार नारायण पाटील तर उपाध्यक्षपदी महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अभयसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी नूतन संचालक मंडळाची बैठक झाली. पाटील यांची निवड अपेक्षित होती. उपाध्यक्षपदासाठी मात्र पाच संचालक इच्छुक होते. त्यामुळे उपाध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आदिनाथ साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच होऊन त्यात सर्व २१ जागा आमदार नारायण पाटील व माजी आमदार जयवंत जगताप यांच्या गटाने जिंकल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार या दोघांची ताकद पाठीशी असूनही माजी आमदार संजय शिंदे यांच्या गटाला पराभवाची नामुष्की पत्करावी लागली होती.
आदिनाथ साखर कारखाना कर्जाच्या प्रचंड ओझ्याखाली आहे. संपूर्ण करमाळा तालुक्याचा राजकीय केंद्रबिंदू मानला जात असला तरी हा कारखाना पुन्हा नव्याने सुरू करण्याचे आव्हान नूतन अध्यक्ष, आमदार नारायण पाटील यांना पेलावे लागणार आहे. सरकारच्या मदतीशिवाय पुन्हा सुरू होणे अशक्य मानले जाते. याबाबत नारायण पाटील म्हणाले, आदिनाथ कारखान्यावर कोट्यवधींचे कर्ज आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत मी कारखान्याचा अध्यक्ष झालो आहे. शासनाची मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची भेट घेणार आहे.