सोलापूर : दुबईमध्ये झालेल्या १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाकडून केलेल्या चमकदार कामगिरीमुळे प्रकाशझोतात आलेला सोलापूरचा अर्शीन कुलकर्णी यास आयपीएल क्रिकेट स्पर्धांसाठी लखनऊ सुपर जायन्ट्स संघात संधी मिळाली आहे. त्यासाठी झालेल्या लिलावात त्याला २० लाख रुपयांत विकत घेण्यात आले आहे. त्यामुळे सोलापूरकरांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. अतुल कुलकर्णी यांचा मुलगा असलेला अर्शीन हा वयाच्या सहाव्या वर्षापासून क्रिकेट धडे गिरवत यशस्वीपणे दमदार वाटचाल करीत आहे. दुबईतील १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर ७ गडी राखून मात केली होती. या सामन्यात अफगाणिस्तानने भारतासोर १७४ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. अर्शीन कुलकर्णीने या सामन्यात भारतासाठी नाबाद ७० धावांसह ३ बळी घेत, अष्टपैलू खेळी करीत विजय मिळवून दिला होता. मागील वर्षी झालेल्या विनू मंकड चषक स्पर्धेत महाराष्ट्राकडून अर्शीन सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. याशिवाय मुश्ताक आली चषक स्पर्धेतही त्याला वरिष्ठ महाराष्ट्र संघाकडून खेळण्याची संधी मिळाली असता अंतिम फेरीत त्याने शतक झळकावले होते. इतर काही शानदार कामगिरींची त्याच्या नावावर नोंद आहे.

हेही वाचा – “फेब्रुवारीत अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण देणार”, मुख्यमंत्र्यांच्या विधानावर जरांगे-पाटील इशारा देत म्हणाले…

हेही वाचा – मराठा आरक्षणाला विरोध नाही परंतु ओबीसी मधून देणार नाही – लक्ष्मण हाके

अर्शीन हा अवघ्या सहा वर्षांचा असताना सोलापुरात त्याच्या आजीने त्याला सलीमखान क्रिकेट अकादमीमध्ये दाखल केले. लहानपणीच त्याने फलंदाजीसह लेग स्पिनर गोलंदाजीत मोठी प्रगती केली. शारीरिक उंची वाढत गेली, तसे त्याने अष्टपैलू म्हणून सलामीच्या फलंदाजीसह वेगवान गोलंदाजीमध्ये लौकिक मिळवायला सुरुवात केली. साऊथ सोलापूर क्रिकेट क्लबमधूनही त्याने क्रिकेटचे धडे घेतले. त्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षी तो पुण्यात क्रिकेट शिकण्यासाठी गेला. त्याने उत्तरोत्तर प्रगती करीत आता आयपीएल क्रिकेट स्पर्धेतही लखनऊ सुपर जायन्टस् संघाच्या माध्यमातून स्थान मिळविले आहे. त्यामुळे सोलापूरकर त्याच्यावर चांगलेच फिदा झाले आहेत.