सोलापूर : श्रीमंत कुटुंबात जन्माला येऊन देखील सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात कधीही अहंभाव आणि श्रीमंतीचा दर्प आला नाही. त्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले आहेत. परंतु, काही मंडळी स्वतःच्या कर्तृत्वापेक्षा वडिलांच्या नावावर नुसत्या फुशारक्या मारतात, अशा शब्दांत शिवसेनेचे प्रमुख नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांचा नामोल्लेख टाळून टोला लगावला.
अक्कलकोटमध्ये काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, जलसंधारणमंत्री संजय राठोड यांच्यासह विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते. गुरुवारी दुपारी तीन वाजता म्हेत्रे यांचा शिवसेना पक्षप्रवेश सोहळा होणार होता. परंतु, नाशिक येथून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना येण्यास तब्बल सहा तास उशीर झाला. रात्री नऊ वाजता त्यांचे आगमन झाले. ते म्हणाले, सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला आहे. जेथे दिशा नाही, तेथे दशा झाली. येणाऱ्या काळात विरोधकांचा एकही तंबू शिल्लक राहणार नाही. म्हेत्रे हे अनुभवी नेते आहेत. त्यांच्या नावातच राम आहे. ते शिवसेनेत आल्यामुळे आता सोलापूरसह अक्कलकोट आणि दुधनी शहराचे भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. म्हेत्रे यांच्या पाठीशी आपली ताकद कायम राहील. त्यांचा आपल्याकडून नेहमीच सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अक्कलकोटमध्ये आयोजित या पक्षप्रवेश मेळाव्यासाठी दुपारी दोनपासून हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मेळाव्यात व्यासपीठावर आल्यानंतर उशीर झाला असतानाही वाट पाहात थांबल्याबद्दल लोटांगण घालत जनसमुदायाला अभिवादन केले.
यावेळी बोलताना म्हेत्रे यांनी आपण वैयक्तिक फायद्यासाठी नव्हे तर अक्कलकोट तालुक्यातील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेत आलो असून, कुरकूर धरणाचे आणि देगाव जोड कालव्याचे उर्वरीत काम पूर्ण करण्यासाठी सहाशे कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. याच व्यासपीठावर शिवसेनेच्या अनिता माळगे यांनी आपल्या आक्रमक भाषणात, अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवत त्यांना थेट आव्हान दिले.
शरद पवार गटाचा आमदार शिवसेनेच्या व्यासपीठावर
माजी मंत्री म्हेत्रे यांच्या शिवसेना प्रवेश सोहळ्यात पक्षाच्या बहुसंख्य नेत्यांनी हजेरी लावली होती. मात्र, याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मोहोळ येथील आमदार राजू खरे हेसुद्धा शिवसेना नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. त्यांनी एका स्थानिक वृत्तपत्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमनानिमित्त स्वागताची जाहिरातही दिली होती. आमदार खरे यांनी यापूर्वीही आपण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार असलो तरी आपण पूर्वी शिवसैनिक होतो. एकनाथ शिंदे यांना आपण नेता मानतो, असे वक्तव्य केले होते.