सोलापूर : सोलापुरात यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा वरचेवर वाढत चालला असून, बुधवारी यंदाच्या हंगामातील सर्वोच्च ४३.८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा वाढला होता. तापमान ४४ अंशांच्या दिशेने पुढे सरकत असल्यामुळे सोलापूरकर अक्षरशः हैराण झाले आहेत.

दरम्यान, सकाळपासून तीव्र उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना दुपारनंतर ढगाळ वातावरण दिसून आले. शहरातील विजापूर रस्त्यासह आसपासच्या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वारेही सुटले होते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले गावात काही घरांवरचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याची घटना घडली. तसेच काही झाडे उन्मळून कोसळली. मात्र, सुदैवाने या वादळात कोणतीही जीवितहानी नाही.

सोलापुरात मागील आठवड्यापासून तापमानाचा पारा उत्तरोत्तर वाढत गेला आहे. यापूर्वी १५ एप्रिल रोजी सोलापूरचे तापमान ४२.८ अंश सेल्सिअसवर गेले होते. १८ एप्रिल रोजी त्यात वाढ होऊन तापमानाचा पारा ४३.२ अंशांवर गेले होते. २० एप्रिलपासून सलग दोन दिवस तापमान ४३ अंश सेल्सिअसवर होते. त्यानंतर काल मंगळवारी ४३.४ अंश सेल्सिअसवर तापमानाचा पारा पोहोचल्यानंतर त्यापाठोपाठ बुधवारी दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा आणखी वाढून तो ४३.८ अंशांवर गेला. तापमान ४४ अंशांच्या दिशेने जात असल्याने सोलापूरकरांची झोप उडाली आहे.