सोलापूर : गेल्या तीन दिवसांनंतर सोलापुरात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. आज सकाळअखेर पडलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १६.३ मिमी इतका पाऊस झाला. सर्वांत जास्त पाऊस अक्कलकोटमध्ये २८.७ तर सर्वांत कमी म्हणजे प्रत्येकी ३.३ मिमी पाऊस करमाळा आणि बार्शी या तालुक्यात पडला. दरम्यान, गेल्या मे महिन्यापासून झपाट्याने भरलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा नंतर परिस्थिती पाहून नदीवाटे सोडल्यामुळे धरणाची पातळी कमी ठेवण्यात आली होती. परंतु, अखेर आज सकाळी सहा वाजता धरण प्रथमच १०० टक्के भरले. यात धरणातील एकूण पाणीसाठा ११७.५४ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा ५३.९३ टीएमसी इतका झाला आहे. धरणातील पाणीसाठा १००.६७ टक्के इतका झाला आहे.

सोलापुरात गेल्या तीन दिवसांनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. अक्कलकोट-२८.७ मिमी, सांगोला-२६.०, दक्षिण सोलापूर-२१.२ मिमी, माढा-२०.७, उत्तर सोलापूर-१९.५, मोहोळ-१८.३, पंढरपूर-१७.९, माळशिरस-१६.०, मंगळवेढा-१५.२, करमाळा आणि बार्शी-प्रत्येकी ३.३ मिमी याप्रमाणे कमीजास्त पावसाची नोंद झाली आहे. चालू ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या पडलेल्या पाऊस जास्त झाला आहे. तालुकानिहाय एकूण पाऊस आणि सरासरी पाऊस याप्रमाणे आहे.

उत्तर सोलापूर (११६.०, ८६.७), माळशिरस (५८.३, ७५.८), मोहोळ (७०.३, ६५.०), माढा (५७.७, ५६.९), दक्षिण सोलापूर (७६.७, ५२.०) अक्कलकोट (६६.२, ४८.५), पंढरपूर (५२.९, ४७.७) याप्रमाणे एकूण सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मंगळवेढा (४४.३, ४८.९) व करमाळा (२६.२, २६.९) येथे मात्र एकूण सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाल्याचे दिसून आले. उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ११७ टीएमसी होऊन धरण शंभर टक्के भरले असले तरी धरणात आणि ६ टीएमसी अतिरिक्त पाणी साठवून येते. म्हणजे एकूण १२३ टीएमसी एवढा पाणीसाठा होऊ शकतो.