सोलापूर : अलीकडे सर्वत्र प्रदूषण वाढले आहे. नदी, नाले, समुद्र प्रदूषित बनले आहेत. मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी नद्यांचे आरोग्य बिघडवले आहे. वेळीच खबरदारी घेऊन नदी, नाल्यांचे आरोग्य जपत परिसर पाणीदार बनवण्यासाठी प्रयत्न होणे, ही काळाची गरज असल्याचे मत प्रख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे पीएम उषा योजनेअंतर्गत ‘चला जाणूया नदीला’ या विषयावर आयोजित एनएसएस कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत डॉ. राजेंद्र सिंह बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, जल बिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चूघ आदी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले, आज आधुनिक शिक्षण घेताना नवीन शैक्षणिक धोरणात देखील पर्यावरण, प्रदूषण, जलसाक्षरता या विषयावर विशेष लक्ष देण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले ज्ञान मिळेल. नदी, नाल्यांच्या आरोग्यावर सर्वांनी प्रेम करणे आवश्यक आहे. आज पाण्यावरच जीवन अवलंबून आहे. पाणीदार परिसर होण्यासाठी सर्वांनी वृक्षारोपण, छोटे, मोठे बंधारा तयार करणे, जमिनीत पाणी मुरवण्यासाठी विविध उपक्रम राबवणे आवश्यक आहे. पाणी असेल तर शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होतो. चांगली शेती कसता येते. त्यासाठी सर्वांनी यावर प्रेम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. महानवर यांनी, विद्यापीठाने हरित पर्यावरणासाठी पाच वर्षांत पाच लाख वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला आहे. तसेच दोन तलावांचे खोलीकरण, रुंदीकरण, सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याचे सांगितले. या कार्यशाळेस विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजा सरवदे, प्रा. सचिन गायकवाड, ॲड. मल्लिनाथ शहाबादे, ज्येष्ठ लेखिका सुरेखा शहा, रजनीश जोशी, डॉ. विनोद बोधनकर, मिलिंद पगारे आदी उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली यांनी केले, तर आभार डॉ. वीरभद्र दंडे यांनी मानले.