सोलापूर : चालू फेब्रुवारी महिन्यात सुरूवातीपासून रात्री व पहाटे थंडी आणि दिवसभर उष्मा असा अनुभव सोलापूरकर घेत असताना आता तापमान वाढत चाळिशीच्या दिशेने मार्गक्रमण करू लागले आहे. गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ होत असून थंडी हळूहळू गायब होत आहे.गेल्या १५ फेब्रुवारीपासून सोलापूरचे तापमान ३७ अंशांच्या पुढे सरकत चालले आहे. तत्पूर्वी, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमान हळूहळू वाढत ३५-३६ अंश सेल्सिअसवर सरकत होता. मात्र रात्री विशेषतः पहाटे कडाक्याची थंडी जाणवत होती. त्यात आता बदल घडत आहे.

गेल्या १५ फेब्रुवारी रोजी तापमान ३७.८ अंश सेल्सिअसवर होते. त्यानंतर गेल्या १९ फेब्रुवारी रोजी तापमान आणखी वाढून ३८ अंश सेल्सिअसवर गेल्यापाठोपाठ २० फेब्रुवारी रोजी ३८.१ अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झाली होती. तर किमान तापमानही आता २२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. आदल्या दिवशीच्या तुलनेने शुक्रवारी तापमान ३७.८ अंश सेल्सिअस इतके होते. मागील आठवड्यापासून तापमानात चांगलीच वाढ होऊ लागल्याने उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सकाळी नऊपासून ऊन जाणवत असून दुपारी तापमानाचा पारा त्रासदायक ठरत आहे. येत्या काही दिवसात तापमान ४० अंश सेल्सिअस पार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गारवा देणाऱ्या वस्तूंना मागणी

दरम्यान, उन्हाळा जाणवत असल्यामुळे बाजारात उष्णतेपासून दिलासा मिळविण्यासाठी गरिबांचा फ्रीज समजल्या जाणाऱ्या मातीच्या डेऱ्यांना मागणी वाढली आहे. विद्युत पंखे, वातानुकूलित यंत्रणा, शीतपेटी व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात गर्दी वाढली आहे. घरात बंद करून ठेवलेले कूलर बाहेर काढून त्यांची दुरुस्ती केली जात आहे.