प्रदीप नणंदकर, लातूर
लातूर शहर व ग्रामीण मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक गड मानला जातो. या गडाला व देशमुखांच्या बाभळगावच्या गढीला धक्के देण्याचे प्रयत्न भाजपकडून झाले होते. मात्र या विधानसभा निवडणुकीत गढी व गड अभेद्य ठेवण्यात देशमुख यशस्वी झाले. अर्थात यासाठी भाजपचीच मदत झाल्याची चर्चा लातूरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
नगर पंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, लोकसभा अशा प्रत्येक निवडणुकीत जिल्हय़ात भाजपने काँग्रेसवर वरचष्मा दाखवला होता. लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ‘झिरो टू हिरो’ भूमिका बजावली. लातूर ग्रामीण मतदारसंघातही भाजपने प्रचंड मुसंडी मारली होती. भाजपसमोर काँग्रेसचा टिकाव लागेल की नाही, असे वातावरण निर्माण झाले. मात्र, विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी जाहीर होताना लातूर ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेच्या पारडय़ात कसा व कोणी टाकला हे कोणालाच कळले नाही. शिवसेनेचा एकही नेता प्रचाराला येण्याचे धाडस दाखवू शकला नाही किंवा उमेदवार का प्रचार करत नाही याबद्दलही कोणी विचारले नाही. परिणामी काँग्रेसचे धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून १ लाख १९ हजार ८२६ मतांनी विजयी झाले. या मतदारसंघात भाजपच्या मंडळींनी आपला रोष नोटाला २७ हजारांपेक्षा अधिक मते देऊन व्यक्त केला.
लातूर शहर मतदारसंघात भाजपने उमेदवार निश्चितीत प्रचंड घोळ घातला. अनेक मातबर इच्छुक असताना शैलेश लाहोटी यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली. पहिले आठ दिवस तर त्यांच्या प्रचारात कोणतीच हालचाल नव्हती. केवळ पाच दिवस प्रचार करून २०१४ च्या निवडणुकीइतकीच मते त्यांना मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारालाही फारशी मते न मिळाल्याने अमित देशमुख यांचा विजय सुकर झाला. मात्र भाजपने या मतदारसंघात म्हणावी तशी प्रचारयंत्रणा राबवली नाही याचीही चर्चा जिल्ह्य़ात आहे. किंबहुना देशमुख कुटुंबीयांचे नेतृत्व जपावे, यासाठी भाजपतील काही मंडळी जागरूक असल्याचेही उघडपणे बोलले जात आहे.
अर्थात देशमुख कुटुंबीयांनी निवडणुकीत सर्व शक्ती पणाला लावून प्रचार केला. प्रचाराचा स्तर कायम टिकवत शहर व ग्रामीण मतदारसंघात मतदारांपर्यंत आपली भूमिका मांडली. अभिनेते रितेश देशमुख यांनीही प्रचारकाळात वेळ दिला. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा मुरब्बीपणा निवडणूक निकालात दिसून आला.
लोकसभा निवडणुकीत जिल्हय़ातील सहाही विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुधाकर शृंगारे यांना प्रचंड आघाडी मिळाली होती. दोन लाख ७५ हजारांपेक्षा अधिक मतांनी ते निवडून आले. असे असताना चार महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या. भाजपतील अंतर्गत गटबाजीकडे प्रदेश स्तरावरील नेतृत्वाने दुर्लक्ष केल्याने ही स्थिती ओढवली.