Speaker Rahul Narwekar on Clash at Vidhan Sabha : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर व राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी विधान भवनाच्या आवारात केलेल्या हाणामारीचे आज सभागृहात पडसाद उमटले. याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडून कारवाईची अपेक्षा होती. त्यानुसार अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठी कारवाई केली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर विधान भवन परिसरात आलेले अभ्यागत नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यासमवेत आलेले अभ्यागत सर्जेराव टकले या दोघांचे वर्तन सभागृहाची प्रतिमा व प्रतिष्ठा मलीन करणारे होते. त्यांच्याविरोधात चौकशी करून विशेषाधिकार भंग अवमानाची कारवाई करण्यास्तव मी हे प्रकरण विधानसभा विशेषाधिकार समितीकडे सुपूर्द करत आहे. तसेच या दोघांवर फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.

विधानसभा अध्यक्षांची सर्व सदस्यांना तंबी

नार्वेकर म्हणाले, “जितेंद्र आव्हाड व गोपीचंद पडळकर या विधानसभा सदस्यांनी देशमुख व टकले या दोन अभ्यागतांना विधान भवनात आणले. त्यांच्या आक्षेपार्ह कृतीमुळे विधिमंडळाची प्रतिमा व प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या दोन्ही विधानसभा सदस्यांनी सभागृहात याप्रकरणी खेद व्यक्त करावा. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची हमी द्यावी. त्याचबरोबर सभागृहाची प्रतिमा व प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल याची काळजी घ्यावी. सभागृहाची प्रतिमा बाधित होईल असे वर्तन सभागृहात व सभागृहाच्या बाहेरही घडणार नाही अशी अपेक्षा मी सर्व सदस्यांकडून बाळगतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधिवेशन काळात अभ्यागतांना प्रवेश बंद

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधीमंडळाच्या व सर्व सदस्यांच्या सुरक्षिततेसाठी आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. आता विधिमंडळ परिसरात अधिवेशन काळात विधिमंडळ सदस्य, त्यांचे स्वीय सहायक आणि शासकीय कर्मचाऱ्यांनाच प्रवेश मिळेल, असं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार नाही याचा त्यांनी पुनरुच्चार केला. गुरुवारी विधिमंडळात मेन पोर्च इथे दोन सदस्यांच्या अभ्यागतांदरम्यान झालेल्या मारहाणीच्या घटनेची चौकशी विधिमंडळाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात झाली असून, त्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे असंही अध्यक्षांनी स्पष्ट केलं. या अहवालानुसार विधीमंडळ ही कारवाई करत असल्याचं त्यांनी सांगितलं. अध्यक्षांनी यावेळी सर्व सदस्यांना विधान मंडळाच्या उच्च परंपरांचं पालन करणे ही आपली घटनात्मक जबाबदारी असल्याची जाणीव करून दिली.