कोल्हापूर : गोकुळ दूध संघात महायुतीचा अध्यक्ष करण्याची भूमिका घेतली तेव्हाच या संस्थेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढायचे ठरले होते. गोकुळच्या संचालक मंडळाची संख्या वाढल्याने शेतकऱ्यांनाच फायदा होणार आहे. याबाबत महाडिक कुटुंबीयांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांशी बोलून समाधान करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या महामार्गाबाबत काही पर्याय समोर आलेले आहेत. शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान कसे होईल हे पाहिले जात आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाइलवर रमी खेळत असल्याबाबत आमदार रोहित पवार यांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यावर मुश्रीफ यांनी रोहित पवार यांना अजित पवार यांची जागा घेण्याची घाई झाली आहे, असा टोला लगावला.काँग्रेसचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल हे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असतील तर त्यांचे स्वागत करू. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे मुश्रीफ यांनी नमूद केले.
मानेंचा अश्वमेध
पदवीधर निवडणुकीसाठी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भय्या माने यांनी उमेदवारी मागितली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा अधिकार आहे हे आम्ही महायुतीच्या बैठकीमध्ये पटवून देऊ. त्यासाठी माने यांचा अश्वमेध रिंगणात सोडला आहे, असे म्हणत मुश्रीफ यांनी आपल्या खंबीर सहकार्याची उमेदवारीसाठी पाठराखण केली.
दरम्यान लातूर मधील पक्षतील वादाचे आम्ही कोणीही समर्थन करणार नाही. प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील याबाबत आपली भूमिका मांडली आहे. संबंधितांना पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होते. असे कृत्य करणे चुकीचे आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करतील. अशा पद्धतीच्या गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी टाळल्या पाहिजेत. मत मतांतर असू शकते. मात्र विचाराचा सामना विचाराने करायला पाहिजे. असे गुद्द्यावर येऊन चालणार नाही, असा सल्ला मुश्रीफ यांनी दिला.
आम्ही महायुतीमध्ये आहोत. त्यामुळे शिवसेना वा राष्ट्रवादी दोन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी भाजपला आम्हाला विचारावे लागेल असे तटकरे म्हणाले आहेत. याबाबतची वस्तुस्थिती काय आहे. हे मला मुंबईला गेल्या नंतरच समजेल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.