पोलिस भरतीत नक्षलग्रस्त भागातील उमेदवारांना विशेष सूट देण्यात आली असून अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलिस खबऱ्या व पोलिस पाटील, पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुलांना शारीरिक पात्रता शिथील करण्यात आली आहे. याचा लाभ भरतीदरम्यान नांदेड, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या चार नक्षलग्रस्त भागातील मुलांना होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य शासनाच्या वतीने २०१७ मध्ये मोठय़ा प्रमाणात पोलिस भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेत गडचिरोली जिल्ह्य़ात स्थानिकांना प्राधान्य मिळावे, तसेच नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी, शिपाई, खबऱ्या व अनुसूचित जमातीच्या मुलांना स्थान मिळावे, यासाठी अनेक नियम शिथील केले आहेत. नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतुदीत शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसुचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलिस बातमीदार अथवा पोलिस पाटील, पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुलांमधील उमेदवारांबाबतीत शारीरिक पात्रता शिथील करण्यात आली आहे. यात  पुरुष व महिला उमेदवारांसाठी अनुक्रमे ५ किलोमीटर व ३ किलोमीटर धावण्याऐवजी पुरुष उमेदवारांना १६०० मीटर धावणे व महिला उमेदवारांना ८०० मीटर धावणे ही शारीरिक चाचणी द्यावी लागणार आहे. शिपाईपदाच्या भरतीसाठी किमान वयोमर्यादा १८, तर खुल्या प्रवर्गाकरिता जास्तीत जास्त २८ वष्रे व मागासवर्गीय प्रवर्गासाठी जास्तीत जास्त ३३ वष्रे राहील. शिपाईपदाकरिता उमेदवाराने मोटरवाहन अधिनियम १९८८ मधील कलम २ (२१) नुसार हलकी वाहने चालविण्याचा परवाना धारण केला असणे आवश्यक आहे, परंतु तो धारण न करणाऱ्या उमेदवाराने नियुक्तीनंतर त्यांचे पोलिस प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर दोन वर्षांच्या आत परवाना धारण करण्यात येईल व त्या कालावधीत हा परवाना धारण न केल्यास निवड रद्द ठरवून सेवा समाप्ती करण्यात येईल. याबाबतचे बंधपत्र सादर केल्यास असा उमेददवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहील, तसेच उमेदवाराने संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र धारण करणे अंतर्भूत करण्यात आले असून नमूद केलेल्या पदावर नियुक्त व्यक्तीने शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालकाकडून वेळोवेळी विहित करण्यात येणारे संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special discount in police recruitment
First published on: 20-01-2017 at 01:42 IST