काश्मीर मुस्लीमबहुल राज्य असताना बेगडी धर्मनिरपेक्षता जपण्यासाठी विशेष दर्जा देण्याचे पाप काँग्रेसने केले. मतपेटी सांभाळण्यासाठी काश्मीरला स्वातंत्र्यानंतर ७० वर्षे विकासापासून वंचित ठेवण्यात आले. अविचाराने ३७० व्या कलमाची तरतूद करून अब्दुल्ला, मुफ्ती व सादिक या तीन घराण्यांना राज्य आंदण दिले होते. यातून मोदी सरकारने काश्मीरला राष्ट्राच्या विकासप्रवाहात आणण्याचे मोलाचे काम केले आहे, असे मत भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.
खा. सहस्रबुद्धे यांचे विद्यार्थी विकास परिषदेच्या वतीने सांगली अर्बन बँकेच्या सभागृहात काश्मीर : काल, आज आणि उद्या या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. निवृत्त कॅप्टन श्रीकांत वालवडकर हे अध्यक्षस्थानी होते.
खा. सहस्रबुद्धे म्हणाले की, काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम हे अभेद्य बुरुजासारखे होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या कुशल रणनीतीमुळे हा बुरूज नेस्तनाबूत करण्यात सरकारला यश आले. याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटू नयेत यासाठी परराष्ट्रमंत्री यांनीही प्रयत्न केले. यामुळे हिंदू व मुस्लीम अशा सर्वानाच समान नागरिक होण्याचा अधिकार मिळाला आहे.