भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आज रक्षाबंधनानिमित्त सर्व बहीण-भावांना खास शब्दांमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, ज्यांना पंकजा मुंडेंकडून राखी बांधून घ्यायची होती, परंतु ते शक्य झालं नाही. अशांसाठी व सर्व माता-भगिनींसाठी देखील पंकजा मुंडे यांनी विशेष संदेश दिला आहे. फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करून त्यांनी आपली भावना व्यक्त करत, शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंकजा मुंडें म्हणतात, “नमस्कार, राखी पोर्णिमेच्या रक्षाबंधनाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या छोट्याशा बहिणीला, मोठ्या आईसारख्या बहिणीला, आपल्या भावाला, ज्यावर आपण मुलासारखं प्रेम करतो किंवा एखादा मोठा भाऊ ज्याला आपण वडिलाप्रमाणे आदर देतो. त्या सगळ्यांना आज आपल्याला खूप शुभेच्छा द्याव्या वाटतात. खूप प्रेम दाखवावं वाटतं, असा आजचा दिवस आहे.”

…त्या बहिणीचा तुमच्यावर पहिला हक्क –

तसेच, “आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक नात्यासाठी एक सण आहे. याचं मला खूप कौतुक वाटतं. आज बहीण-भावाचा सण मी सगळ्यांना खूप शुभेच्छा देते. अनेकांची अशी अपेक्षा होती की त्यांनी येऊन मला भेटावं आजच्या दिवशी आणि मी त्यांना राखी बांधावी. इतक्या लोकांनी ही अपेक्षा व्यक्त केली की मला आज असं वाटतंय की मी किती भाग्यवान आहे. एवढ्या भावांची माझ्याकडून राखी बांधून घेण्याची इच्छा आहे. तर ते लोक माझ्यापर्यंत पोहचू शकले नाहीत किंवा मी त्यांना राखी बांधण्यासाठी वेळ दिला नाही, याचं कारण असं आहे की ज्या बहिणीने तुम्हाला अंगाखांद्यावर खेळवून वाढवलेलं आहे किंवा ज्या बहिणीला तुम्ही साखरेचं पोतं म्हणून पाठीवर घेऊन मिरवलेलं आहे. त्या बहिणीचा तुमच्यावर पहिला हक्क आहे.” असं पंकजा मुंडे सांगतात.

त्यामुळे तुम्ही मला प्रत्यक्षात भेटून राखी बांधून घेण्याची आवश्यकता नाही –

याचबरोबर, “मी बहीण आहेच, ताई आहेच पण ती बहीण तुमची आज फार आतुरतेने वाट पाहते आहे. तुम्ही तिच्याकडून राखी बांधून घेतली, तिला आठवणीने एखादी छान भेट दिली. तर ती माझ्यापर्यंत पोहचेल. तिचं जे ओतप्रोत तुमच्यावर प्रेम आहे त्या प्रेमाची बरोबरी मला करता येणार नाही. मी ज्या लोकांना अगोदरपासून राखी बांधत आली आहे, त्यांनाच राखी बांधते आहे त्यात वाढ केलेली नाही. कारण, जर सगळेच राखी बांधायला आले तर तो एक राजकीयच कार्यक्रम होतो व ते सगळं मला चुकीचं वाटतं. तुमच्या मनातून निघालेला धागा माझ्या मनापर्यंत पोहचलेला आहे. आपल्यामध्ये न दिसणारं असं एक नातं तयार झालेलं आहे. जे खूप शक्ती देणारं आहे. त्यामुळे तुम्ही मला प्रत्यक्षात भेटून राखी बांधून घेण्याची आवश्यकता नाही. आपल्या बहिणीवर खूप प्रेम करा. बहिणीचा आदर करा आणि आपल्या बहिणीसारखाच इतर बहिणींचा आदर करा. एवढंच जर केलत तर नक्कीच मला आनंद वाटेल.” असंही पंकजा मुंडेंनी बोलून दाखवलं आहे.

भावांकडून आजच्या दिवशी असं काही वचन घ्या…-

“स्त्रीचा जन्म झालाच यासाठी आहे, की या विश्वामधील जेवढ्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या शुद्ध करण्यासाठी स्त्रीचा जन्म झालेला आहे. त्यामळे नुसती एखादी गोष्ट सहन करणं म्हणजे स्त्री आहे असं आपल्याला वाटायला लागतं. पण सहन करणारी स्त्री असते, कारण स्त्रीची शक्ती अफाट असते, पण स्त्री सहन करण्याबरोबर शुद्धही करत असते. त्यामुळे सर्व माता-भगिनींना हीच विनंती आहे. की तुमच्या भावांकडून आजच्या दिवशी असं काही वचन घ्या, सगळ्या स्त्री जातीचा आदर त्यांनी करावा, स्त्रीकडे आदराने बघावं, स्त्रीला सुरक्षा, सन्मान द्यावा अशाप्रकारचा शब्द नक्कीच त्यांच्याकडू ओवाळणीत घ्या.” असं पंकजा मुंडे शेवटी म्हणाल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special wishes from pankaja munde on the occasion of rakhi purnima msr
First published on: 22-08-2021 at 12:57 IST