नाशिक दौऱ्यावर गेलेले युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रेंजरोव्हर गाडीचा टायर खड्ड्यांमुळे फुटल्याची घटना समोर आली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारला चिमटा काढला आहे. राज्यातील खड्डा दाखवा बक्षीस मिळवा योजनेतील हजार रुपये आदित्य ठाकरे यांना द्यावे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे शनिवारी नाशिक दौऱ्यावर होते. शुक्रवारी नाशिकला जात असताना घोटीजवळ त्यांच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचा टायर फुटल्याचे वृत्त समोर आले होते. यामुळे आदित्य ठाकरेंना नाइलाजाने दुसऱ्या गाडीने हॉटेलला पोहोचावे लागले. खड्ड्यांमुळे टायर फुटल्याचे सांगितले जाते.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरुन सरकारवर निशाणा साधला. चंद्रकांत पाटील यांनी हे पहावे, राज्यातील सर्वच रस्त्यांची दुरावस्था झाली असून खड्डा दाखवा बक्षीस मिळवा योजनेतले हजार रुपये आता मित्रपक्ष शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांना पण पाठवावेत, असे त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डे दाखवा, बक्षीस मिळवा ही योजना जाहीर केली होती. या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी हा टोला लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spot pothole get 1000 rs reward chandrakant patil aaditya thackeray dhananjay munde
First published on: 25-08-2018 at 15:11 IST