scorecardresearch

आणखी तीन वाघांना पकडण्यासाठी पथक तैनात

वीज केंद्रात आज पुन्हा वाघाने दर्शन दिले. त्यामुळे वीज केंद्र परिसरात फिरणाऱ्या तीन वाघांना जेरबंद करण्याची मोहीम सुरू आहे.

परिसराची पाहणी करताना प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये.

ऊर्जानगर, दुर्गापुरात कडकडीत बंद, मोर्चा; भटारकर यांच्या उपोषणाची सांगता

चंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्रातील एका वाघाला बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात सोमवारी रात्री उशिरा वन खात्याला यश आले. जेरबंद वाघाला गोरेवाडा नागपूर येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. दरम्यान, वीज केंद्र परिसरात भ्रमण करणाऱ्या एक मादी व दोन नर अशा ३ वाघांना पकडण्याची मोहीम वन खात्याच्या वतीने सुरू आहे. तर एक वाघ आज संच क्रमांक ८ व ९ परिसरात दिसल्याने खळबळ उडाली आहे. वाघ व बिबटय़ाला जेरबंद करा, या मागणीसाठी आज, मंगळवारी दुर्गापूर, ऊर्जानगरवासीयांनी कडकडीत बंद पाळला, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढल्याने वन विभागावर दबाव वाढला आहे.

वीज केंद्रात कामगाराचा व ऊर्जानगर येथे सोळा वर्षीय युवकाचा बळी घेणाऱ्या वाघ व बिबटय़ाला जेरबंद करण्याची मोहीम वन खात्याच वतीने राबवण्यात येत असतानाच सोमवारी रात्री उशिरा वसाहतीतील न्यू एफ गाळा येथे पट्टेदार नर वाघाला बेशुद्धकरणाचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात आले. वाघाला जेरबंद करणाऱ्या पथकात ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी वन्यजीव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर अजय मराठे, राकेश आहुजा, पवन कुळमेथे, अतुल मोहुर्ले, भोजराज दांडेकर, अमोल कोरपे, अमोल तिखट, नन्नवरे या पथकाचा समावेश होता. जेरबंद केलेल्या वाघाला नागपूरच्या गोरेवाडा येथे हलवण्यात येणार आहे.

वीज केंद्रात आज पुन्हा वाघाने दर्शन दिले. त्यामुळे वीज केंद्र परिसरात फिरणाऱ्या तीन वाघांना जेरबंद करण्याची मोहीम सुरू आहे. तर ऊर्जानगरातील बिबटय़ाला पकडण्यासाठी तीन पिंजरे लावले आहे. तीन वाघ व बिबटय़ाला जेरबंद करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर वनविभागाच्या निषेधार्थ सुरू असलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या उपोषणाची सांगता झाली. दुर्गापूर, नेरी व इतर परिसरातील बिबटय़ांना पकडण्याकरिता पिंजऱ्यांची संख्या वाढवून गस्त सुद्धा वाढविणार असल्याचे मान्य केले. तसेच या दोन्ही क्षेत्रात वन विभागाने अधिकृत कमीत कमी २ चौकी देऊन त्यात २४ तास वन खात्याचे कर्मचारी ठेवावे ही मागणी मान्य केली. दरम्यान, वाघ व बिबटय़ाच्या बंदोबस्तासाठी ऊर्जानगर, दुर्गापूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला, जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चात माजी सरपंच श्रीमती मायाताई मून, माजी सरपंच अमोल ठाकरे, ऊर्जानगरच्या माजी सरपंच प्रतिभा खन्नाडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अंजय्या मुस्समवार, उपाध्यक्ष दीपक कुंडोजवार, दुर्गापूरच्या सरपंच पूजा मानकर, ऊर्जानगर सरपंच मंजूषा येरगुडे, दुर्गापूरचे उपसरपंच प्रज्योत पुणेकर, ऊर्जानगर उपसरपंच अंकित चिकटे सहभागी झाले होते.

जेरबंद वाघाला नैसर्गिक अधिवास देण्याची मागणी

जेरबंद करण्यात आलेल्या वाघाला नैसर्गिक अधिवास द्या, अशी मागणी राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य तथा इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांच्याकडे केली. जे वाघ मानवी जीवितास धोकादायक आहे. त्यांना कायम िपजरा जेरबंद ठेवण्यात यावे, मात्र जे ‘वाघ’ कुठलाही मानवी घटनेत सहभाग नसलेल्या वाघांना त्याचे योग्य पुनवर्सन म्हणजे नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यासाठी नियोजन आखण्याची विनंती बंडू धोतरे यांनी केली. यावेळी सुनील लिमये यांनी वीज केंद्र व वेकोलि परिसराची पाहणी केली. वीज केंद्रातील वाघाला रात्री उशिरा जेरबंद करण्यात आल्याने वन्यप्राण्याला रात्री कसे जेरबंद केले, असा प्रश्न काही वन्यजीवप्रेमींनी उपस्थित केला आहे.

राजकीय दबाव वाढला

माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत, ऊर्जाराज्यमंत्री प्रजक्त तनपुरे, खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह स्थानिक नागरिक तथा राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून दबाव आल्याने व त्या माध्यमातून दबाव वाढल्यानेच वाघाला इतक्या तडकाफडकी जेरबंद करण्यात आले.

हवेली गार्डन परिसरात वाघ

शहराच्या हवेली गार्डन परिसरात वाघ व दोन पिल्ले दिसल्याने खळबळ उडाली आहे. तसेच वडगाव परिसरात अस्वल लोकांना दिसले. त्यामुळे वाघ व अस्वलाचा बंदोबस्त करावा, अशीही मागणी समोर आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Squad deployed to catch three more tigers zws

ताज्या बातम्या