सावंतवाडी: बेंगलोर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी (५३) यांच्या खून प्रकरणात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि कणकवली पोलिसांच्या पथकाला मोठे यश मिळाले आहे. पथकाने थेट बेंगलोर गाठून उल्लेखनीय कामगिरी करत तीन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या तिघांना सोमवारी रात्री ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना घेऊन कणकवली पोलीस कणकवलीच्या दिशेने रवाना झाले आहेत.
मालमत्ता वादातून खुनाचा प्राथमिक संशय:
चार दिवसांपूर्वी मुंबई-गोवा हायवेपासून जवळच असलेल्या कणकवली – साळीस्ते येथे गणपती सान्याच्या पायरीवर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. तपासानंतर हा मृतदेह बेंगलोर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्याच दिवशी श्रीनिवास रेड्डी यांच्या आईच्या नावावर असलेली आणि रक्ताचे डाग असलेली एक कार दोडामार्ग तालुक्यात तिलारी परिसरात बेवारस अवस्थेत आढळली होती.
मृतदेह आणि कारचे ‘कनेक्शन’ स्पष्ट झाल्यानंतर एलसीबी आणि कणकवली पोलिसांची दोन पथके तातडीने तपासासाठी बेंगलोरला रवाना झाली. गेले तीन दिवस कसून शोध घेतल्यानंतर अखेरीस सोमवारी रात्री उशिरा एलसीबीच्या पथकाने तीन संशयित आरोपींना गजाआड केले. हे आरोपी मंगळवारी सायंकाळपर्यंत कणकवलीत पोहोचतील असा पोलिसांचा अंदाज आहे.
संशयित ताब्यात आल्यामुळे खुनाचे नेमके कारण लवकरच उघडकीस येईल. सध्या, हा खून मालमत्तेच्या वादातून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
पोलिसांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, हा खून साळीस्ते येथेच झाला असावा.
संशयितांनी डॉ. रेड्डी यांना ठार केल्यानंतर त्यांचा मृतदेह साळीस्ते येथे टाकला असावा.
त्यानंतर रेड्डी यांच्या ताब्यातील कार दोडामार्ग तिलारी येथे सोडून आरोपी पसार झाले असावेत.
खून प्रकरणाचे धागेदोरे वरपर्यंत असल्याचा पोलिसांना संशय असून, यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का, या दृष्टीने तपास सुरू आहे. मालमत्ता वादातून खून झाल्याने आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.
