एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळणार, उच्च न्यायालयाने मज्जाव केला असतानाही कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच

ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु, मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी रात्रीपासून पुकारलेल्या संपाला केली मनाई, एसटी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळ काय कारवाई करणार याकडे लक्ष

विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध एसटी डेपोच्या ठिकाणी काम बंद आंदोलन सुरु होते. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या कृती समितीशी चर्चा करत काही मागण्या मान्य केल्या तर काही मागण्यांबाबत दिवाळीनंतर चर्चा करु असे आश्वासन दिले. तेव्हा आंदोलन मागे घेत असल्याचं कर्मचारी कृती समितीने जाहिरही केले. तरीही अनेक एसटीच्या डेपोमध्ये काम बंद आंदोलन कर्मचाऱ्यांचे सुरुच राहीले. या आंदोलनाला भाजपच्या नेत्यांही उघडपणे पाठिंबा दिला.

‘संघर्ष एसटी कामगार संघटना’ आणि ‘महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटना’ या दोन संघटनांनी बुधवारी रात्रीपासून संप करणार असल्याची नोटीस एसटी महामंडळाला दिली. तेव्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत या नोटीशीला आव्हान देण्यात आले. यावर आज सकाळीच अंतरिम आदेश देत न्यायालयाने या संपाला मनाई केली.

असं असतांना एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन राज्यात अनेक ठिकाणी सुरु आहे. एसटी महामंडळाचे राज्यात २५० डेपो असून आज आंदोलनामुळे ५० पेक्षा जास्त डेपोतून एकही एसटी बाहेर पडली नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु राहिल्याने आज रात्रीपासून खरोखर संप केला जातो का याकडे सर्वाचं लक्ष लागून राहीलेलं आहे.

ऐन दिवाळीतल्या आंदोलनामुळे एसटी प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला आहे. सरकारकडून न्याय मिळत नसल्याच्या कारणावरुन काही एसटी कर्मचाऱ्यांनी या आंदोलन काळात आत्महत्या केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे. तेव्हा आज रात्रीपासून संप झाला तर दिवाळीनंतर संबंधित एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा एसटी महामंडळ उचलण्याची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: St workers agitation will gone worse workers agitation continues despite high court ban asj

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या