राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अशातच सोमवारी रात्री पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याचंही बघायला मिळालं. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी महसूल विभागाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करावे, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे, असे म्हणत संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार उभं आहे, असा विश्वासही त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिला.
हेही वाचा – अवकाळी मुसळधार; चना गहू कोसळला, आंबेमोहोर गळाला, होळी विझल्या
दरम्यान, सोमवारी अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नाशिकमध्ये द्राक्षांची झाडं कोसळली तर येवल्यात काढणीस आलेला गहू जमीनदोस्त झाला. तर तीन एकर कांदादेखील भिजल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जळगावमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊन झाल्याने केळी आणि गहू या पिकांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच पालघरमध्येही आंब्यासह इतर रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं. तसेच अमरावतीसह विदर्भातील काही भागातही कापसांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं.