हिंगोली : नरेंद्र मोदी हे दूरदृष्टी असलेले व जी २० च्या रूपाने देशाला जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था निर्माण करणारे पंतप्रधान आहेत. त्यांच्या तिसऱ्या कारकिर्दीमध्ये भारताला तिसऱ्या क्रमांकावर आणायचे आहे, असे सांगत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पूर्वी महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात दहा हजार कोटी मिळायचे, आता १५ हजार ७०० कोटींची तरतूद केली असल्याचे शनिवारी येथे सांगितले.
हिंगोली येथून मुंबईसाठी सुरू झालेल्या जनशताब्दी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत दाखविण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी मंचावर खासदार हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे, शिवाजी माने, गजानन घुगे, रेल्वेच्या विभागीय अधिकारी नीती सरकार आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा >>>“गाढवाला चंदन लावलं तरीही ते उकिरड्यावर…”, तुकोबांचा अभंग वाचत देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
या वेळी दानवे म्हणाले, की लवकरच संभाजीनगपर्यंतचे दुहेरीकरण होईल. त्यापुढच्या सर्वेक्षणासाठीही आर्थिक तरतूद केल्याने आगामी काळात मुदखेडपर्यंत दुहेरीकरण होईल. महाराष्ट्राला पूर्वी रेल्वे बजेटमध्ये दहा हजार कोटी मिळायचे. आता १५ हजार ७०० कोटी दिले. सन २०२४ अखेर सर्व मार्गाचे दुहेरीकरण करण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे.
खासदार हेमंत पाटील म्हणाले, की या मागास जिल्ह्याला रेल्वेने मुंबईशी जोडणे अतिशय गरजेचे होते. पूर्णा ते अकोला मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असले, तरीही काही ठिकाणी वीज उपकेंद्र उभारण्यास जागा मिळत नाही. ती देण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले, तर तिरुपती ते अकोला ही रेल्वेगाडी सुरतपर्यंत नेण्याची मागणी पूर्ण होईल.