हिंगोली : जिल्ह्यातील वसमत व कळमनुरी तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतातील फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वसमत तालुक्यात ३४९ हेक्टर शेतातील फळपिकांचे नुकसान झाले. ५२ टक्के पंचनाम्याचे काम पूर्ण झाले. कळमनुरीत ७६३.७० हेक्टर जमिनीवरील पिकाचे नुकसान झाले. पंचनाम्याचे काम ३७ टक्के पूर्ण झाल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पावसामुळे बाधित गावाची संख्या ४९, जखमी व्यक्ती ८, अंशतः पडझड झालेल्या पक्क्या घराची संख्या ३९, अंशतः पडझड झालेल्या कच्च्या घरांची संख्या ३५४ एवढी आहे. एक झोपडी नष्ट असून बाधित गोठ्यांची संख्या ९८ एवढी आहे. वसमत तालुक्यात ३४९ हेक्टर वरील केळी, पपई बागांना वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. दाभाडी, खाजनापुरवाडी, सोमठाणा, कानोसा, कुरुंदासह या शेतशिवारातील फळपिकांना अधिक फटका असल्याचे सांगण्यात आले.