मुंबई : आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करण्याबरोबरच अन्य मागण्यांसाठी राज्यातील २५० पैकी ३९ आगारांमध्ये संप सुरूच आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू असून, सोमवारपासून कामगार कामावर रुजू न झाल्यास बडतर्फीची कारवाई करणार असल्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी रविवारी जाहीर केले.

एसटी कामगारांच्या संपामुळे राज्यातील लातूर विभागातील पाच आगारे, नांदेड विभागातील नऊ आगारे, भंडारा विभागातील सहापैकी तीन आगारे, गडचिरोली विभागातील सर्व तीन आगारे, चंद्रपूर विभागातील चार आगारे, यासह कोल्हापूर, वर्धा, सांगली, सोलापूर, नाशिक, यवतमाळ, अमरावती विभागातील एकू ण ३९ आगारे सायंकाळी पाचपर्यंत बंद होते. ज्या-ज्या ठिकाणी एसटी सेवा बंद होती तिथे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. काही राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून कामगारांना संपास भाग पाडणे, आगारांना टाळे लावणे आदी प्रकार घडल्याचे एसटी महामंडळाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याविरोधात महामंडळाने ठिकठिकाणी पोलीस ठाण्यांमध्ये तक्रोरीही नोंदविल्या आहेत, परंतु संप मिटत नसल्याने ऐन दिवाळीत महामंडळालाही नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कर्मचाऱ्यांची समजूत काढून आगार सुरू करण्याचा प्रयत्न के ला जात होता. रात्री आठपर्यंत ३९ पैकी आठ आगारे सुरू झाली. उर्वरित मात्र बंदच होते.

प्रवाशांचे हाल

राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता, वाढीव घरभाडे भत्ता कामगारांना देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतल्यानंतर जवळपास १७ कामगार संघटनाच्या कृती समितीने २८ ऑक्टोबरला आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतरही काही मागण्यांसाठी राज्यातील काही आगारांत संप सुरू असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजप पदाधिकाऱ्यांच्या चिथावणीमुळे काही आगारांमध्ये संप सुरू आहे. कामगारांना भडकावणे, आगारांना टाळे लावण्याचे प्रकार सुरू आहेत. औद्योगिक न्यायालयानेही संपाला स्थगिती आदेश दिला असताना त्याचाही अवमान केला जात आहे. सोमवारपासून (१ नोव्हेंबर) एसटी कामगार कामावर रुजू न झाल्यास बडतर्फीची कारवाई करण्यात येईल.- अनिल परब, परिवहनमंत्री