अहिल्यानगरः जिल्ह्यात अवकाळी पावसाने काल, रविवारी व आज, सोमवारी सर्वदूर हजेरी लावली. पाऊस कमीअधिक स्वरूपाचा झाला असला तरी वादळी वाऱ्याने पाथर्डी, शेवगाव भागात आठ ते दहा घरांची पडझड झाली तर वीज पडून ४ जनावरे दगावली. काढलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली.
हवामान खात्याने दिनांक १४ पर्यंत जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ जारी केलेला आहे. काल, रविवार सकाळपासून हवेतील उकाडा प्रचंड वाढला होता. ढगाळ वातावरणाने त्यात अधिक भर पडली.
सायंकाळी रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. श्रीरामपूर व राहता तालुका वगळता पावसाने सर्वदूर हजेरी लावली. सकाळी ८ वा. नोंदवलेला गेल्या २४ तासांतील पाऊस पुढीलप्रमाणे (आकडे मिमी. मध्ये)- नगर ५.५, पारनेर १०.९, श्रीगोंदे १२.८, कर्जत ३.४, जामखेड १, शेवगाव १, पाथर्डी २.८, नेवासे ६.६, राहुरी १.७, संगमनेर ७.१, अकोले ०.६ व कोपरगाव ०.६. एकूण ४.६ मिमी.
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार पाथर्डी शहरासह सोनुशी, निंबा नांदूर भागात पाच घरांची पडझड झाली. वीज पडून माणिकदौंडी येथे एक म्हैस व तीनखडी येथे बैल मृत्युमुखी पडला. शेवगाव तालुक्यातील कानुशी येथेही तीन घरांची पडझड झाली. संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथे वीज पडून दोन गाईंचा मृत्यू झाला.