नगर : शिवराई, होन या नाण्यांच्या अभ्यासाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समोर येण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्रात शिवराईचे अडीचशेहून अधिक प्रकार पाहावयास मिळतात. त्यांचा अभ्यास करून त्यांचा इतिहास अभ्यासकांसमोर आणण्याचे काम शिवराईप्रेमी करत आहेत. या संशोधन कार्यात अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालयचे नेहमीच सहकार्य राहील, असे प्रतिपादन संग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रवींद्र साताळकर यांनी केले.

अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय व संशोधन केंद्राच्या वतीने एक दिवसीय ‘शिवराई कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी डॉ. साताळकर बोलत होते. वस्तू संग्रहालय व संशोधन केंद्रासाठी टिळक महाविद्यालय व पुणे विद्यापीठाकडून मान्यता घेण्याचे कार्य सुरू असल्याचे डॉ. साताळकर यांनी सांगितले. कार्यशाळेत महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातून ४० अभ्यासक सहभागी झाले होते.

बस्तीमल सोलंकी म्हणाले,की शिवराई कार्यशाळेचे आयोजन होणे, ही सर्व अभ्यासकांसाठी मोठी पर्वणी आहे. अभ्यासकांनी समाज माध्यमावर लिहिण्यापेक्षा शोधनिबंध लिहून त्याचे  सादरीकरण करावे. त्यामुळे शंकाचे निरसन होऊन व्यवस्थित माहिती सर्वासमोर येते. किशोर चंडक म्हणाले, ‘शिवराई’ विषयावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. शिवराईच्या प्रत्यक्ष वापराबाबत अनेक मतमतांतरे आहेत. नवीन संशोधकांना अधिक अभ्यास करून इतिहास समोर आणता येणार आहे. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिपुर्ण अभ्यास होण्यासाठी व इतिहास जाणून घेताना  ‘शिवराई’ या पैलूंचा उपयोग होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संग्रहालयाचे अभिरक्षक डॉ. संतोष यादव यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. कार्यशाळेसाठी आनंद कल्याण, बापू मोढवे, राहुल भोर, गणेश रणसिंग, रामदास ससे यांनी सहकार्य केले.

  • कार्यशाळेत अमोल बनकर यांनी शिवराईचा मागोवा, अंकुश देवरे यांनी मराठी नाणी प्रोजेक्ट, पुरुषोत्तम भार्गवे यांनी ईस्ट इंडिया कंपनी आणि शिवराई, किशोर चंडक यांनी शिवराई आणि शिवराईची वजने, पोपटलाल हळपावत यांनी छत्रपतींच्या शिवराईवरील चिन्हे याबद्दल शोधनिबंधांचे वाचन करून अधिक माहिती दिली.