महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे. पंतप्रधानांनी घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर अजित पवार सत्तेत सहभागी झाले. या गोष्टीचा तुम्हाला राग यायला पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. याला मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार यांची मुलाखत घेताना राग आला नाही का? असा सवाल मुनगंटीवार यांनी राज ठाकरे यांना विचारला आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

“अजित पवार सत्तेत सहभागी झाले, या गोष्टीचा तुम्हाला राग यायला पाहिजे. राष्ट्रवादीच्या लोकांनी जलसंपदा विभागात ६० हजार कोटींची घोटाळा केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. त्यानंतर सहा दिवसांनी ती माणसं सत्तेत सहभागी होतात,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

हेही वाचा : “ब्राम्हण समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत”, छगन भुजबळ यांचं वक्तव्य

“ठाकरेंचं सरकार असताना अजित पवारांना क्लिनचिट”

यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “शरद पवारांवर राज ठाकरेंनी अनेक आरोप केले. मग, शरद पवारांची मुलाखत घेताना राज ठाकरेंना राग आला नाही का? जनतेला राग येतो का? माहिती नाही. पण, स्वत:ला राग येतो ना? ज्या राष्ट्रवादीबद्दल राज ठाकरे सांगतात, ते अजूनही भाजपाबरोबर आले नाहीत. उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना अजित पवारांना क्लिनचिट देण्यात आली आहे.”

हेही वाचा : “कोणाला सरस्वती आवडते, तर कोणाला शारदा, पण आमच्यासाठी महात्मा फुले अन्…”, छगन भुजबळ यांचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राज ठाकरेंची सत्ता येणार आहे का?”

‘सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलं नाही’, असं राज ठाकरेंनी म्हटलं. यावर सुधीर मुनगंटीवर यांनी सांगितलं, “कोणताही राजकीय पक्ष अमर नाही. जनतेच्या हितासाठी, लोककल्याणासाठी, राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन कार्य केलं, तर जनता आशीर्वाद देते. भाजपाने चूका केल्या, तर सत्ता जाईल. भाजपाची सत्ता गेल्यानंतर राज ठाकरेंची सत्ता येणार आहे का? फक्त तोडफोड करणे राजकारण आहे का?”