गेल्या तीन चार वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. राज्याच्या राजकारणात अनेक स्फोट झाले. यापैकी एक म्हणजे पहाटेचा शपथविधी. २०१९ मधील विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने (उद्धव ठाकरे) भाजपासोबत युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तास्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्याचवेळी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्तास्थापनेचा दावा केला होता. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे सातच्या सुमारास या दोघांनी राज्यपाल भवन येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या पहाटेच्या शपथविधीबाबत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नुकताच एक मोठा गौप्यस्फोट केला. माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना धडा शिकवायचा होता, म्हणून पहाटेचा शपथविधी झाला होता.

सुधीर मुनंगटीवार यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत गौप्यस्फोट केल्यापासून राज्याच्या राजकारणात विविध राजकीय चर्चा सुरू झाल्या. दरम्यान, टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना मुनगंटीवार यांनी त्या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी मुनगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला की, उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी किंवा अजित पवारांसोबतच्या शपथविधीसाठी पहाटेची वेळ का निवडली. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी ती पहाट कुठे होती असं घुमजाव केलं.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ती पहाट कुठे होती? सकाळी ८ वाजता कुठे पहाट असते का? पहाटेचा शपथविधी हा शब्द योग्य नाही. हा शब्द वापरला तर विद्यार्थ्यांचं सामान्य ज्ञान बिघडेल. त्यामुळे तुम्ही सकाळची वेळ म्हणा.

हे ही वाचा >> पहाटेच्या शपथविधीवेळी किती आमदार अजित पवारांबरोबर होते? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “आम्हाला सांगितलेलं…”

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आम्ही शपथविधीसाठी सकाळची वेळ निवडली कारण सकाळी ८ वाजता साधारणतः आपल्याला गनिमी कावा करायचा असतो. तेव्हा योग्य वेळ ही सकाळ किंवा रात्रीची असते. आम्ही मुहूर्त पाहून किंवा कुठल्या ज्योतिषाकडून वेळ घेतली नव्हती. मुळात हे उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठीचं पॉलिटिकल ऑपरेशन होतं.