पावसाने ताण दिल्यामुळे उसाच्या उत्पादनात घट झाली. साखरेचे भावही पडल्यामुळे कारखाने अडचणीत आले. कारखाने ऊस नेत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी उसापासून गूळ तयार करण्यावर भर दिला. मात्र, गुळाचा भावही पडला. परिणामी ऊस उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे.
दरवर्षी लातूर बाजारपेठेतून गुळाची विक्री मोठय़ा प्रमाणावर होते. खरेदी केलेला माल धुळे, नंदूरबापर्यंत पाठविला जातो. धुळे जिल्ह्य़ात आठवडय़ात सात ते आठ गाडय़ा गूळ पाठविला जात होता. यावर्षी केवळ दोन गाडय़ांवरच तो स्थिरावला आहे. ग्राहकांकडून मागणी नसल्यामुळे गुळाची विक्री होत नाही. सध्या गुळाचा भाव २१०० रुपये प्रतििक्वटल आहे. गतवर्षी हा भाव २५०० ते २८०० रुपयांपर्यंत होता. साखरेचेच भाव २४०० रुपये प्रतिक्विटल असल्याने गुळाचेही भाव वाढणार नाही, असे सांगितले जाते. येत्या काही दिवसांत गुळाच्या दरात वाढ होण्याची शक्यता नसल्याने, गोदामात साठवणूक करून व अधिक रक्कम खर्ची घालण्यापेक्षा मिळेल त्या भावाने गूळ विकणे हा पर्याय शेतकरी स्वीकारत असल्याची माहिती गूळ व्यापारी ललितभाई शहा यांनी दिली.
यावर्षी उसाचे उत्पादन घटल्यामुळे पहिल्या टप्प्यात गुळाची आवकही ७० टक्के घटली होती. साखर कारखाने सुरू झाल्यानंतर ती आवक आणखीन कमी होईल, असा अंदाज होता. साखर कारखान्याप्रमाणे अनेक भागात उसापासून गूळ तयार करणारे उद्योग सुरू झाले आहेत. प्रारंभी गुळाचा भाव २२०० ते २३०० रुपये प्रतििक्वटल असल्यामुळे शेतकऱ्यांनी काही दिवस भाव वाढेल या आशेवर गूळ बाजारात पाठविला नाही. आता आवक एवढी आहे की, गूळ ठेवण्यासाठी शीतगृहांमध्ये व गोदामामध्ये गूळ ठेवायला जागाच शिल्लक नाही.
साखरेवरही संकट
साखरेच्या भावात मोठी घसरण झाल्यामुळे केंद्र सरकारने साखर निर्यातीसाठी कच्च्या साखरेवर  प्रतििक्वटल ४०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या साखरेच्या भावात मोठी घसरण झाली. त्यामुळे केंद्र सरकारचे अनुदान मिळूनही विदेशात १९५० रुपये प्रतििक्वटल दराने कच्ची साखर निर्यात करणे साखर कारखान्याला परवडत नाही. आपल्या देशात साखरेचे भाव घसरले आहेत. साखर दीर्घकाळ साठवण्याचे पुरेसे तंत्रज्ञान आपल्याकडे विकसित नाही व तितका काळ तग धरू शकण्याची स्थितीही आपल्या उद्योगाची नाही. आगामी वर्षभर साखरेचे भाव वाढण्याची शक्यता धुसर असल्यामुळे साखर उद्योग कधी नव्हे इतका संकटात सापडला असल्याचे नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugar rate down
First published on: 02-03-2015 at 01:40 IST