नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. सुजय विखे यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार केला होता. त्यांच्यासाठी त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील (राज्याचे महसूल मंत्री) आणि भाजपा नेतृत्वाने सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही निलेश लंके यांनी विजय मिळवला. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुजय विखे यांनी आता मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, “कामं करूनही आपल्याला वेगळा निकाल पाहायला मिळाला. यातून मी एक अनुभव घेतला आहे. अनुभवातून माणसं शिकत असतात. त्यानुसार मी आता लोकांशी संपर्क वाढवणार आहे.”

सुजय विखे पाटील म्हणाले, “आता आगामी काळात मी मतदारसंघात जनसंपर्क वाढवणार आहे. तसेच माझा सर्व पदाधिकाऱ्यांना सल्ला आहे की त्यांनी ग्रामंपचायती, पतसंस्था शिस्तीत चालवाव्या. आपल्या ग्रामपंचायतीतला मतदार म्हणून त्याला सवलत द्यायची, हे असलं काही करू नका. एकवेळ राजकारणात मागे हटावं लागलं तरी चालेल मात्र या संस्था टिकवल्या पाहिजेत. अर्थकारणासाठी या संस्था महत्त्वाच्या आहेत. ते तुम्ही आमच्यावर सोडा. राजकारण आणि बँकेचं अर्थकारण वेगवेगळं ठेवा. उद्या तुम्ही पतसंस्था उघडल्या तर मला उद्घाटनाला बोलवा. मी आता तुमच्यासाठी मोकळा (उपलब्ध) आहे.”

माजी खासदार सुजय विखे पाटील म्हणाले, “आपले कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते वेगवेगळ्या कामांच्या उद्घाटनासाठी, भूमीपूजनासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे वेळ मागतात. मात्र कामाच्या व्यस्ततेमुळे ते वेळ देऊ शकत नाहीत म्हणूण लोकांना थांबावं लागतं. मात्र आता मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही या कामांसाठी मला फोन करा, मी आता मोकळाच बसलोय. कुठलंही काम असेल तर मला उद्घाटनाला बोलवा. याचा अर्थ असा की, राधाकृष्ण विखे पाटील यांना कामाच्या व्यापामुळे वेळ मिळत नाही. त्यामुळे एखादं उद्घाटन लांबत जातं. एखाद्याच्या कारचा नारळ फोडायचा असतो, पण त्या कारचे टायर्स बदलायची वेळ आली तर उद्घाटनाला वेळ मिळत नाही. परंतु, आता तसं होणार नाही. तुम्ही काळजी करू नका, फक्त मला फोन करा.”

हे ही वाचा >> “शिंदे सरकारने तीन वर्षात मला एक रुपयांचा निधी दिला नाही”, जितेंद्र आव्हाडांचा आरोप; म्हणाले, “मी अजित पवारांच्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी खासदार म्हणाले, “मी तुमच्यासाठी दिवसाचे २४ तास, आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असेन. आता मी ठरवलंय मतदारसंघातील लोकांना वेळ द्यायचा आहे. तुमचा वाढदिवस असेल तर त्या वाढदिवसाला मी हजर असेन, कोणाच्या घरी दहावं असेल तर लगेच सांगा, कावळ्याच्या आधी तिथे सुजय विखे पाटील पोहोचेल. मला या निवडणुकीत वेगळा अनुभव आला आहे. प्रत्येक माणूस अनुभवातून शिकत असतो. तुम्ही फक्त मला फोन लावा. मी कधीही तुमच्यासाठी हजर राहणार. त्यामुळे तुमच्या घरी जागरण गोंधळ असेल तर त्या कार्यक्रमाला तुम्ही मला बोलावलं नाही तर मी तुमच्यावर कारवाई करेन. बदललेल्या राजकारणानुसार माणूस बदलला पाहिजे. एखादा नेता एकतर फिरत राहू शकतो किंवा कामं करू शकतो. या निवडणुकीत आपल्याला वेगळा अनुभव आला आहे. त्यामुळे आता मी सर्वांशी संपर्क ठेवायचं ठरवलंय.”